आगामी निवडणुकांत शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा! ,तेल्हारा व अकोट तालुक्यातील रेल्वे भूमि अधिग्रहणात कवडीमोल मोबदला ठरविल्या मुळे शेतकऱ्यांची कठोर भूमीका!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.२९ :- अकोला हिवरखेड खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प करिता अकोला जिल्ह्यामधील अकोट व तेल्हारा तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहणात समाविष्ट असल्याने रेल्वे भूमी अधिग्रहणाचा शेतकऱ्यांना कवडीमोल मोबदला ठरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळला असून योग्य मोबदल्याचा निर्णय न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
अकोला हिवरखेड खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प करिता अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा व अकोट तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात भूमी अधिग्रहणात समाविष्ट आहे. परंतु सदर भूसंपादनामध्ये जमीन मोबदल्या संदर्भात आपल्यावर प्रचंड अन्याय होत असल्याची रेल्वे भूमि अधिग्रहण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भावना आहे. कारण भूसंपादन करताना, भूमी संपादन पुनर्वसन पुनर्स्थापना करीत असताना उचित भरपाई मिळण्याचा पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या संपूर्ण तरतुदींचे उल्लंघन करून भूसंपादन अधिकारी हे त्यांच्या स्वतःच्या नियमाने भूसंपादन करीत आहेत. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यांना महाराष्ट्रामध्ये याआधी बारामाही बागायती प्रमाणे तसेच बाजार मूल्याप्रमाणे रेल्वे करिता आपल्याच अमरावती विभागातील वर्धा यवतमाळ पुसद नांदेड या रेल्वे प्रकल्पाकरिता झालेल्या भूमी अधीग्रहणाच्या निवाड्याच्या प्रति दिल्या आहेत आणि या पाठपुराव्याच्या आधारे त्यांनी सदर रेल्वे प्रकल्पाकरिता होत असलेल्या भूमी संपादनाच्या साठी दिलेल्या पुराव्याच्या प्रमाणे आपण सुद्धा अशाच प्रकारे निवाडा पारित करावा ही विनंती केलेली आहे परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांना डावलून संपूर्ण शेतीचे जिरायती प्रमाणे मूल्यांकन करून शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे तसेच बाधित शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे यावरून आपल्या विदर्भात महाराष्ट्र मध्ये एकाच विभागात दोन प्रकारे निवाडे रेल्वे करिता संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार केले जात आहे.? याची माहिती भूसंपादन अधिकारी अकोट यांनी बाधित शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा बाधित शेतकऱ्यांकडून यावर्षी होऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांवरील हा अन्याय पंधरा दिवसात दूर करण्यात आला नाही तर शेतकरी हा लढा अधिक तीव्र करतील याची गंभीर नोंद जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी अकोट यांनी घ्यावी असे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आणि प्रसिद्धी पत्रकातून शासनास निर्वाणीचा इशारा दिला आहे.
राजकुमार भट्टड, अध्यक्ष, रेल्वे प्रकल्प बाधित शेतकरी संघर्ष समिती तेल्हारा तालुका यांची प्रतीक्रिया :-
पंधरा दिवसात अन्याय दूर झाला नाही तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा बहिष्कार केल्या जाईल व आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. कवडीमोल मोबदला देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये.



