पैशांसाठी पोटच्या मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला; विटेने डोक्यात मारून केले रक्तबंबाळ

देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल; पिंपळगाव चिलमखा शिवारातील घटना
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर



देऊळगाव राजा: खर्चासाठी पाच हजार रुपये मागितले असता, पैसे देण्यास नकार देणाऱ्या जन्मदात्या आईलाच मुलाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलाने आईला शिवीगाळ करत विटेने डोक्यात प्रहार केल्याने आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पिंपळगाव चिलमखा शिवारात घडली.
याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंगना लखन भोसले (वय ३४, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) आणि आरोपी रोहन लखन भोसले हे आई-मुलगा आहेत. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी आरोपी रोहन याने आईकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगताच संतापलेल्या रोहनने ‘तू मला पैसे कसे देत नाहीस?’ असे म्हणत विटेने आईच्या डोक्यात आणि उजव्या कानाच्या वर जोरदार वार केला.
या हल्ल्यात कंगना भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. जखमी आईने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा रजि. नं. ३७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करत आहेत.



