दुष्काळग्रस्त भूमिहीन शेतमजुरांना ५० हजारांची तातडीची मदत द्या; सुजित बांगर आजाद समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; रोजगार, मोफत शिक्षण व विमा संरक्षणाचीही मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- ५ ऑक्टोबर २०२६
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भूमिहीन कष्टकरी व असंघटित शेतमजूर कुटुंबांना शासनाने तातडीने प्रति कुटुंब ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत सादर करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी शासन विविध उपाययोजना जाहीर करीत असताना भूमिहीन शेतमजुरांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पेरणीपासून कापणीपर्यंत शेतात प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या शेतमजुरांना दुष्काळामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. “जमीन नाही म्हणून माणसाची गरज कमी होत नाही. शेतमजूर हा नागरिक म्हणून शासनाच्या मदतीपासून वंचित राहू शकत नाही,” अशी भूमिका आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी निवेदनातून मांडली. भूमिहीन कष्टकरी शेतमजुरांच्या प्रत्येक पात्र कुटुंबाच्या बँक खात्यात कोणतीही अनावश्यक अट न लावता ५० हजार रुपये थेट जमा करावेत, भूमिहीन शेतमजुरांना वर्षभर हमीचा रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच त्यांच्या मुला-मुलींचे शालेय, महाविद्यालयीन व उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच भूमिहीन शेतमजुरांसाठी स्वतंत्र सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजना लागू करावी, विमा संरक्षण द्यावे, दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्य व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि ग्रामपातळीवर भूमिहीन शेतमजुरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
“ही मागणी केवळ निवेदनापुरती मर्यादित समजू नये. शासनाने भूमिहीन कष्टकरी शेतमजुरांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आजाद समाज पार्टीच्या वतीने भूमिहीन शेतमजुरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा सुजित बांगर यांनी दिला.
भूमिहीन कष्टकरी शेतमजुरांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष गौरव झिने जिल्हा नेते पंकज शेगोकार, चिखली तालुका अध्यक्ष महादेव जाधव, शेख सलीम, विजय सपकाळ, सुरेश मोरे, सत्यवान काकडे,संजय शिंगणे, ऋषी लहाने यांच्यासह आजाद समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते.



