अखेर कुणाल भाऊ सावळे यांच्या तक्रारीची दखल; मलकापूर रेल्वे मालधक्क्यावर माथाडी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश

मलकापूर : (मलकापूर)
मलकापूर रेल्वे मालधक्का येथे माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व वृत्तपत्र निवासी संपादक कुणाल भाऊ सावळे यांनी दिनांक 18/05/2026 रोजी केलेल्या तक्रारीची अखेर कामगार विभागाने दखल घेतली आहे.
अकोला-वाशिम-बुलढाणा जिल्हा माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव महेंद्र जाधव यांनी रेल्वे मालधक्का पर्यवेक्षक, मलकापूर यांना पत्र देऊन माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1969 अंतर्गत मलकापूर रेल्वे मालधक्क्यावर काम करणाऱ्या कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वे मालधक्क्यावर माल भरणे, उतरविणे, वजन करणे व संबंधित कामे करणाऱ्या कामगारांची माहिती मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदार/एजंट, माथाडी कामगारांची संख्या, मजुरी वाटप, कामाचे स्वरूप तसेच सुरक्षा साधनांबाबत माहिती मागविण्यात आली आहे.
कामगारांना पी.एफ., उपदान, बोनस, वैद्यकीय सुविधा, अपघात नुकसानभरपाई यासारखे कायदेशीर लाभ मिळत आहेत का, याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कुणाल भाऊ सावळे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मलकापूर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नाला अधिकृत स्तरावर दखल मिळाली असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.



