सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड, तरीही गुन्हा नाही! मुक्ताईनगर पोलिसांची दिरंगाई संशयाच्या भोवऱ्यात”

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात मुक्ताई सहकारी उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाची तोडफोड व साहित्य चोरी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी चांगलाच गाजला. सुरुवातीला चोरीचा संशय व्यक्त केला जात असतानाच चौकशीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले. पंपगृहातील साहित्य चोरी न होता ते नियोजनबद्धरीत्या तोडफोड करून स्थलांतरित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत कार्यकारी अभियंता, तापी खोरे सर्वेक्षण विभाग, जळगाव यांनी उपविभागीय अभियंता यांना मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले. जलसंपदा विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा कल्पना न देता सार्वजनिक पंपगृहाची तोडफोड व साहित्य स्थलांतर करण्यात आले असून, यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मात्र विशेष म्हणजे, दि. २० रोजी लेखी आदेश दिले असतानाही अद्यापपर्यंत एफआयआर दाखल झालेली नाही. त्यामुळे “आदेश असूनही गुन्हा नोंदवण्यात उशीर का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसारख्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात प्रशासन व पोलिसांकडून होत असलेली ही दिरंगाई संशयास्पद मानली जात आहे. दोषींवर कारवाई टाळण्यासाठी दबाव, दुर्लक्ष की संगनमत — असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर नेमकी केव्हा कारवाई होणार? एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यासाठी आणखी किती दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार? याकडे मुक्ताईनगरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांमधील रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



