राजकीय ताकद विरुद्ध जनतेचा विश्वास! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार मनोज कायंदे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय; देऊळगाव राजा शहरात फटाक्यांची आतिशबाजी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक: राजकीय दादागिरीला शह; आमदार मनोज कायंदे यांच्या ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’चे २ उमेदवार विजयी!
देऊळगाव राजा:बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांकडून आपल्या उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोज कायंदे यांनी सहकार क्षेत्रात जोरदार एन्ट्री घेतली आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांचे मोठे बळ विरोधात उभे असतानाही, आमदार कायंदे यांच्या ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ने ७ पैकी २ जागांवर ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला. या स्वाभिमानी विजयाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून, देऊळगाव राजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फटाक्यांची जोरदार आतिशबाजी आणि अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला.
दिग्गजांच्या फौजेविरुद्ध एका आमदाराची ऐतिहासिक लढत
या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे यांच्या विरोधात प्रचंड मोठे राजकीय बळ मैदानात उतरले होते. विरोधी छावणीत १ केंद्रीय मंत्री, २ कॅबिनेट मंत्री, ६ माजी मंत्री, १० आजी आमदार आणि तब्बल १० माजी आमदार अशी दिग्गजांची मोठी फौज तैनात होती. एवढी प्रचंड राजकीय यंत्रणा आणि सत्ता बळ विरोधात असतानाही, आमदार मनोज कायंदे यांनी केवळ आपल्या नेतृत्वावर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली. ही लढाई केवळ २ जागांची नव्हती, तर ती ‘अफाट राजकीय ताकद विरुद्ध सर्वसामान्य जनतेचा विश्वास’ अशी होती, हे या निकालाने सिद्ध केले आहे.
ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे यांचा विजय
निवडणूक प्रक्रियेतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आमदार कायंदे यांनी अत्यंत कमी वेळात ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ उभे केले होते. या पॅनलच्या माध्यमातून रिंगणात उतरलेले अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत शानदार विजय संपादन केला. या विजयामुळे सहकार क्षेत्रात आमदार मनोज कायंदे यांचे वजन कमालीचे वाढले असून, विरोधकांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
“देऊळगाव राजा शहरात फटाक्यांची आतिशबाजी आणि जल्लोष”
विजय घोषित होताच देऊळगाव राजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकच गर्दी केली. “आमदार मनोज कायंदे आगे बढो”, “अजितदादा पवार यांचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. कार्यकर्त्यांनी चौकाचौकात एकत्र येत फटाक्यांची मोठी आतिशबाजी केली आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या विजयाने आगामी काळातील स्थानिक राजकारणाला एक नवी दिशा दिली असल्याचे बोलले जात आहे.



