तालुकास्तरीय लोकशाही दिन नियमित सुरू करण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे एकाच ठिकाणी तातडीने निराकरण व्हावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज झ्यंबक इंगळे व रामेश्वर नामदेव झोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा तसेच तहसीलदार, तहसील कार्यालय देऊळगाव राजा/सिंदखेडराजा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन नियमितपणे होत नसल्याने नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी अडचणी येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार लोकशाही दिनाचे आयोजन करणे बंधनकारक असतानाही देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन नियमितपणे होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. लोकशाही दिनाबाबत कार्यालयामार्फत वृत्तपत्रात जाहिरात अथवा सूचना प्रसिद्ध करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्येही याबाबत पुरेशी जनजागृती होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असून, नागरिकांच्या अर्जांवर व तक्रारींवर योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तसेच विभागांना आवश्यक सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून शासनाच्या नियमानुसार दर तीन आठवड्यांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे नियमित आयोजन करावे, तसेच सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत स्पष्ट सूचना देऊन नागरिकांना लोकशाही दिनाची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकशाही दिनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या प्रशासनासमोर थेट मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुकास्तरीय लोकशाही दिन नियमित सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



