खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र
पवारांचे ,चला हवा येऊ द्या!

तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रात राजकिय नाट्य चालू आहे.राजकारण नाही,राज्यनाट्य! येथे राम गणेश गडकरींचे राजसंन्यास सुद्धा फिके वाटू लागते.ही संकल्पना खूप बौद्धिक आहे.कदाचित चला ,हवा येऊ द्या चे लेखक,निर्माते, दिग्दर्शक, डॉ निलेश साबळे यांचेकडून ही कल्पना घेतली असावी.
शरद पवार साहेब, खूप मोठे राजकारणी आहेत.त्यापेक्षा जास्त राजकीय व्यवसायिक.जेथे हात घालतात तेथे पैसा काढतात."हात घालीन तेथे पैसा काढीन" ही नवीन म्हण त्यांच्यामुळेच बनली आहे.कोणत्याही क्षेत्रात त्यांना अद्याप तोटा झाला नाही.जो जो त्यांच्या सांगाती गेला तो गरीब राहिला नाही.साहेबांचा परीसस्पर्ष कोणालाही कंगाल राहू देत नाही.मुळातच राष्ट्रवादी हा पुंजीवादी लोकांचा पक्ष आहे. राव,उमराव सरदार, मनसबदारांचा पक्ष आहे.काही लोक भ्रष्टवादी म्हणतात.पुंजीवादी ही प्रवृत्ती आहे आणि भ्रष्टवादी ही कृती आहे.प्रवृती आणि कृतीचा योग्य तो संगम साहेबांनी घातलेला आहे.याच कारणे भारतातील कोणत्याही पक्षाशी त्यांना वावडे नाही.जो सत्तेत असेल तो त्यांचा मित्र पक्ष.
साहेबांनी नुकतेच "लोक माझे सांगाती"हे पुस्तक प्रकाशित केले.पुस्तकात आणखी काही लोकांची नावे त्यांनी लिहीली असतीलही.पण आम्ही पाहातो ती माणसे मात्र आम्ही तुम्ही चांगलीच ओळखतो.माझ्या जळगाव जिल्ह्यातील देवकर आणि खडसे ही माणसे त्यांनी मुद्दाम सांगाती घेतली.ते त्या दोन्हींचे कौशल्य पाहूनच.धुळे जिल्ह्यातील हेमंत देशमुख, कदमबांडे,गोटे, नंदुरबार जिल्ह्यातील गावीत , नाशीक मधील भुजबळ, तिकडे नागपूर मधून देशमुख, कोकणातून तटकरे, मुंबई मधून नबाब मलिक, गोंदिया मधून पटेल, कोल्हापूर मधून हसन मुश्रीफ,सातारा मधून श्रीनिवास पाटील आणि कुटुंबातील अजितदादा अशी निवडक व खास खास माणसे साहेबांनी सांगाती घेतल्याचे दिसते.या लोकांच्या अंगी असलेली गुणवत्ता व यांचे पदरी मालमत्ता हेच दोन गुण ग्राह्य धरलेले असावेत.ही माणसे साहेबांच्या राजकीय ध्येय धोरणांना फीट बसतात.
दहा महिन्यापुर्वी साहेबांच्या खुर्चीखालची सत्ता गेली.साहेब अस्वस्थ झाले होते.अजितदादा तर पॅनिक झाले होते.सुप्रिम कोर्टाचा निकाल लागत नाही.तोवर सत्तेबाहेर जास्त दिवस राहाणे म्हणजे रिस्क होऊन बसली.काका,पुतण्या,कन्या यांनी नवीन नाट्य रचले.घरी एकांतात बसून प्रत्येकाचे डायलॉग लिहीले.कोणी काय करायचे?कोणी चूप बसायचे?कोणी कुठे बोलायचे?कुठे पॉझ घ्यायचे?कोणाला फोनवर काय सांगायचे?कोणाला जवळ बोलावून घ्यायचे?कोणी आंदोलन करायचे?हे सर्वच आधीच ठरवून घेतले.साबळेंच्या चला,हवा येऊ द्या मधे तरी भाऊ कदम व कुशल बद्रिके यांना एखादा खाजगी पंच मारण्याचे स्वातंत्र्य असते पण येथे ते ही दिले गेले नाही.भुजबळ यांनी सांगावे कि, सुप्रिया ताई राष्ट्रीय अध्यक्ष होतील.अजितदादा प्रदेश अध्यक्ष होतील.आव्हाड यांनी पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा द्यायचा. तो कोणालाही दिला तर चालतो.अगदी घरच्या मंडळीकडे दिला तरी चालतो. अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायचा पण तो विधानसभा अध्यक्ष कडे देऊच नये.उगीच मंजूर करून टाकला तर पंचायत होईल.
पवार साहेबांनी काहीच बोलायचे नाही.कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू करायचे.नंतर दादा आणि ताई येतील.सांगतील, तुम्ही जेवण करून घ्या.तरीही नाही नाही म्हणायचे.वाटल्यास रात्री अंधारात उरकवून घ्यायचे.राष्ट्रवादीचे श्रीमंत पदाधिकारी उपाशी राहाणे हा वदतो व्याघात आहे.काही महिलांना बोलवून रडल्यासारखे करायचे.एका बाईने म्हटले,माझा बाप मेला तेंव्हा तर मी रडले नाही.आणि आता कसे रडू? राष्ट्रवादी त पद हवे असेल तर रडावे लागेल.सिनेमातील,नाटकातील कलाकार रडतातच बिचारे! ते नेहमी रडतात.तुम्हाला एकच दिवस तर रडायचे आहे.तेथे कट आणि रिटेक असतो.येथे मात्र अनकट असतो.
शरद पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा कोणाकडे दिला असेल? कोण त्यांचा राजीनामा मंजूर किंवा नामंजूर करू शकतो?हा प्रश्न कोणी विचारतच नाही.स्क्रिप्ट मधे ते लिहीलेले नसेल का?अशा अनेक उणिवा राहून गेल्याने ही पोलखोल होऊ शकते.सांप्रत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,मला स्क्रिप्ट वाचायला दिलीच नाही.त्यामुळे मी जर काही डायलॉग बोललो तर प्रेक्षक चूक पकडतील.ड्रामा फेल होऊ शकतो.मधेच सुप्रिया ताई काहीतरी डायलॉग विसरले आणि दुसऱ्याचा डायलॉग बोलू लागल्या तर अजितदादांनी रागावले,तू बोलू नकोस.एकतर डायलॉग पाठांतर केले नाहीत आणि मधे मधे बोलले तर ड्रामा चौपट होऊ शकतो.समजून घे,हे राजीनामा प्रकरण नाही.हे राजीनामा नाट्य आहे.
खरे तर , आम्ही मतदार पांचवी पास आणि नववी नापास असलो तरीही इतके तरी कळते कि,पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षांची निवड बहुधा पक्षाच्या नियोजित अधिवेशनात होते.तेथेच ठरवले जाते कि,कोण अध्यक्ष होईल.असे रस्त्यावर, उघड्यावर बसून अध्यक्ष निवड होतच नाही.पण येथे तर हे नाट्य रस्त्यावर खेळले जात आहे.
नुकतेच दहा महिन्यापुर्वी शिवसेनेचे गुवाहाटी पलायन नाट्य आपण पाहिले.त्या नाटकाचे वाईंड अप अजून झाले नाही तोवर राष्ट्रवादीचा रोड शो मराठी जनतेच्या एंटरटेनमेंट साठी उपलब्ध झालेला आहे.पवार साहेबांनी इतका वेळ दिल्लीतील शेतकरी आंदोलन, मुंबईतील एसटी कर्मचारी आंदोलन,नाणार येथील शेतकरी आंदोलन साठी दिला असता तर देशातील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते.या राजनाट्य मुळे पेपर आणि टिव्ही चा टिआरपी वाढला आहे.याची परतफेड निवडणुकीत केली जाईलच.
पवार साहेब खूप मोठे आहेत.खूप खूप मोठे.पण सामान्य माणसाला, प्रामाणिक माणसाला अजून तरी त्यांच्या सावलीत बसण्याची संधी मिळाली नाही."गरीब आणि प्रामाणिक लोकांना येथे प्रवेश नाही."
…. शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.



