बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गणेशोत्सवात गुलालाऐवजी पुष्पवृष्टीचा आदर्श जिल्हाभर राबवा.. आ. श्वेता महाले पाटील.

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
आवाज न्यायाचा चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

डीजेवर सरसकट बंदीऐवजी डेसिबलची मर्यादा निश्चित करण्याचीदेखील सूचना…

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. चिखली शहरात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत गेल्या काही काळापासून गुलालाचा वापर टाळून विविध फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करण्याची आगळीवेगळी परंपरा सुरू आहे. हा सकारात्मक उपक्रम जिल्हाभर राबविण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान गुलालामुळे अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर चिखलीतील गणेश मंडळांनी गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून शांतता आणि सौहार्दाचा आदर्श निर्माण केला आहे. हा उपक्रम इतर शहरांमध्येही राबविल्यास गणेशोत्सव अधिक आनंददायी आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करणारा ठरेल, असे आमदार श्वेता महाले यांनी बैठकीत सांगितले.

चिखली शहरातील सर्वधर्मीय सलोख्याच्या परंपरेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर मुस्लिम समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी केली जाते, तर ईदच्या मिरवणुकीवर हिंदू बांधवांच्या वतीने पुष्पवृष्टी करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात. सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा हा चिखली पॅटर्न जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेशोत्सव हा तरुणाईच्या उत्साहाचा आणि प्रत्येक कुटुंबाच्या आनंदाचा सण आहे. त्यामुळे डीजेवर सरसकट बंदी न लादता, पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांशी संवाद साधून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन होईल अशा पद्धतीने डेसिबलची मर्यादा निश्चित करावी आणि त्यानुसार डीजे वापरास परवानगी देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी सूचनाही आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली.

यासोबतच गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी घरगुती गणपतींच्या विसर्जनाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडली. महानगरांच्या धर्तीवर घरगुती गणपतीची पूजा आणि आरती पूर्ण झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांकडून गणेशमूर्ती संकलित करून त्यांचे नियोजित पद्धतीने सार्वजनिक विसर्जन करावे, यावर प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असण्यासोबतच सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि शांततेचा संदेश देणारा उत्सव ठरावा, यासाठी प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले…✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button