शिस्त, भक्ती आणि श्रद्धेचा संगम; संत गजानन महाराजांची पालखी शेगाव नगरीत दाखल…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
शेगाव:- १९ ऑगस्ट २०२६
संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याने भक्तिमय वातावरणात खामगाव ते शेगाव हा पायी प्रवास पूर्ण केला. पंढरपूरची वारी पूर्ण करून संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतली असून, मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत केले. खामगाव हे पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे व अंतिम मुक्कामाचे ठिकाण आहे. सकाळी लवकरच खामगाव शहरातून हजारो वारकरी, दिंड्या, टाळकरी, पताकाधारी व सेवेकरी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी संपूर्ण मार्गावर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यावर्षी संत गजानन महाराजांच्या पालखीला सुमारे १३०० किलोमीटरचा शिस्तबद्ध पायी प्रवास पूर्ण करून शेगाव नगरीत आगमन झाले. पालखीचे शेगावमध्ये आगमन होताच भाविकांनी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने स्वागत केले. आकर्षक रांगोळ्या, स्वागत कमानी व विविध ठिकाणी करण्यात आलेली सजावट यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले. पालखी मार्गावर भाविकांसाठी चहा, फराळ तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खामगाव ते शेगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी नियोजन केले. पालखी मार्गाची स्वच्छता राखण्यासाठी सामाजिक संघटनांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालखी सोहळ्यादरम्यान शिस्त, स्वच्छता आणि सेवाभावाचे दर्शन घडले. नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांनी वारकऱ्यांची सेवा करून या भक्तिमय सोहळ्यात आपले योगदान दिले. शिस्त, भक्ती, सेवा आणि श्रद्धेच्या या अनोख्या संगमामुळे शेगाव नगरीत संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन अत्यंत उत्साहपूर्ण आणि अविस्मरणीय ठरले…….



