ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक व्यवहारावरील निर्बंध हटवा

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर



देऊळगावराजा :ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात करण्यात आले आहे.मात्र प्रशासकांना आर्थिक व्यवहारावर निर्बंध घातल्याने गावातील विकासकामे आणि नागरी सुविधा प्रभावित होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक व्यवहारावरील निर्बंध तातडीने हटवा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,सध्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.मात्र, प्रशासकांच्या आर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. याचा थेट फटका ग्रामीण जनतेला बसत आहे.आर्थिक निर्बंधांमुळे गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, जन सुविधाची कामे, अनुसूचित जाती नवबौद्ध वस्त्यांचा विकास आणि प्राथमिक आरोग्याशी संबंधित तातडीची कामे रखडली आहेत. पावसाळा किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावात उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ खर्च करणे प्रशासकांना अशक्य झाले आहे. परिणामी गावात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीचा दैनंदिन प्रशासकीय खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे कठीण झाले आहे.तसेच प्रशासकांना मर्यादित आर्थिक अधिकार असल्यामुळे नागरिकांच्या हक्काच्या नागरी सुविधा त्यांना मिळत नसून ग्रामीण जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.त्यामुळे ग्रामीण जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि गावांचा विकास गाडा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासकांच्या आर्थिक व्यवहारांवरील जाचक निर्बंध तातडीने शिथिल करण्यात यावेत किंवा पूर्णपणे हटवण्यात यावेत.या मागणीवर सकारात्मक आणि जलद निर्णय झाला नाही, तर पक्षाच्या वतीने ग्रामीण जनतेच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे, तालुका युवक अध्यक्ष गजानन चित्ते,प .स.चे माजी सभापती हरीश शेटे,पिंप्री आंधळे सरपंच सौ. अंजली आंधळे,सावखेड भोई सरपंच सौ.संगीता शेटे आदींनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.



