सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टिप्पणी वादात; काँग्रेसच्या भाषाशैलीवर अंजली दमानिया यांचे सवाल

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने वापरलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दप्रयोगावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काँग्रेसच्या भाषाशैलीवर तीव्र आक्षेप घेत, महिला नेत्यांबाबत अशा प्रकारची भाषा कोणत्याही जबाबदार राजकीय पक्षाला शोभणारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवरून काँग्रेसने सरकारवर निशाणा साधत आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर, “धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा झाले आहेत का? आणि सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला.काँग्रेसच्या या शब्दप्रयोगावर अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रतिक्रिया नोंदवत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, “‘गुंगी गुडिया’… काय ही भाषा? राजकीय विरोध असू शकतो, टीका करता येते; मात्र एखाद्या महिला नेत्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरणे योग्य नाही.” त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचाही उल्लेख करत, अशा भाषेला पक्षाची मान्यता आहे का, असा सवाल उपस्थित केला.दमानिया यांनी पुढे स्पष्ट केले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकांवर अनेकदा टीका केली असून आंदोलनही केले आहे. मात्र, राजकीय मतभेद असले तरी महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी अंजली दमानिया यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस या टीकेवर स्पष्टीकरण देते का, तसेच पुढील काही दिवसांत या वादाचे राजकीय पडसाद कसे उमटतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



