कर्ज काढून फुलवलेली शेती पुराच्या तडाख्यात उद्ध्वस्त; बोडखा येथील शेतकरी आर्थिक संकटात

संग्रामपूर | प्रतिनिधी : संगीता उमाळे | दि. १ ऑगस्ट २०२६
संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते, औषधे तसेच मशागती व मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र अवघ्या काही तासांत आलेल्या पुराच्या पाण्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. अनेक शेतांतील पिके पूर्णपणे जलमय झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
हातात पीक नाही, उत्पन्नाचा आधार नाही आणि दुसरीकडे कर्जफेडीची चिंता अशा दुहेरी संकटात बोडखा गावातील शेतकरी सापडला आहे. “आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे?” असा प्रश्न प्रत्येक बाधित शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच पीक विमा व शासकीय मदतीचा लाभ त्वरित मिळावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



