अपघातखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर दुभाजकाच्या कामादरम्यान भीषण अपघात टळला; युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष ॲड. चेतन झनके थोडक्यात बचावले

बोदवड रोडवरील दुभाजकाच्या कामात सुरक्षेचा अभाव?; ट्रॅक्टर रिव्हर्स घेतल्याने कारवर ट्रॉली चढली, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरातील महाजन पेट्रोल पंपासमोरील बोदवड रोडवर सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामादरम्यान रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठा अपघात टळला. या घटनेत मुक्ताईनगर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके हे थोडक्यात बचावले.मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. चेतन झनके व विशाल झनके हे मलकापूर येथून काम आटोपून मुक्ताईनगरकडे येत होते. रात्री सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास महाजन पेट्रोल पंपासमोरील दुभाजकाच्या कामामुळे वाहतूक संथ झाली होती. त्यावेळी त्यांच्या समोर असलेला ट्रॅक्टर अचानक थांबला. एसटी बसला मार्ग मिळावा म्हणून ट्रॅक्टरचालकाने कोणतीही खात्री न करता ट्रॅक्टर थेट रिव्हर्स घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.झनके बंधूंनी सतत हॉर्न वाजवून इशारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने कानात हेडफोन लावले असल्याने त्याला आवाज ऐकू गेला नसल्याचे सांगण्यात आले. मागे ट्रक उभा असल्याने कार मागे घेण्याचीही संधी नव्हती. परिणामी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्यांच्या एमएच-१९-बीयू-८७०४ क्रमांकाच्या व्हर्ना कारच्या बोनेटवर चढले. ट्रॉली बोनेट फाडत पुढील काचेपर्यंत पोहोचली. सुदैवाने काही इंचांच्या अंतरावरच दोघांचा जीव वाचला.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताचा धक्का आणि ट्रॅक्टरचा वेग इतका जास्त होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले.या घटनेनंतर ॲड. चेतन झनके यांनी प्रशासनाला अवजड वाहनांच्या गावातील वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दुभाजकाच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक, बॅरिकेड्स आणि वाहतूक नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच यापूर्वीही बऱ्हाणपूर रोडवर भरधाव डंपरच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर चालकाचे वय अंदाजे १७ ते १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आला असून, याबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. तसेच या प्रकरणी पोलिस तपासानंतरच अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button