पंचशील नगरच्या हक्कासाठी उपोषणाचा एल्गार; भीम आर्मीचा जाहीर पाठिंबा, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी – विकास भाऊ खंडेराव……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २६ जून २०२६
संग्रामपूर तालुक्यातील पंचशील नगर, सोनाळा येथील रहिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आता व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२६ मधील निर्णयानुसार २०११ पूर्वीच्या पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करण्याची प्रक्रिया तातडीने राबवावी, तसेच पंचशील नगरमधील पात्र कुटुंबांना घरकुल व पुनर्वसनाचा लाभ द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणस्थळी भीम आर्मी संग्रामपूर तालुका अध्यक्ष विकास भाऊ खंडेराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनाला भीम आर्मीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत प्रशासनाला नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले. पंचशील नगरमधील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून, न्याय मिळेपर्यंत भीम आर्मी आंदोलनकर्त्यांसोबत ठामपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणकर्त्यांच्या निवेदनानुसार, शासन निर्णय लागू होऊनही पंचशील नगरमधील पात्र अतिक्रमणधारकांचे नियमानुकूलकरण, घरकुल मंजुरी आणि पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पंचशील नगरमधील पात्र कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करणे, पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि संबंधित जमिनीचे मोजमाप करून नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे, अशा मागण्या मांडल्या आहेत. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास लाक्षणिक उपोषण, सरणाच्या लाकडावर झोपून उपोषण, महिलांचे भांडे आंदोलन आणि पिंडदान करून मुंडण आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्वतःच्या हक्काच्या छतासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आणि जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी पंचशील नगरातील नागरिकांनी सुरू केलेला हा संघर्ष केवळ आंदोलन नसून, तो न्याय आणि अस्तित्वाच्या लढाईचा आवाज आहे. प्रशासनाने या आक्रोशाची दखल घेत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे……



