लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी सरपंच सुवर्णाताई टापरे आक्रमक….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २२ मे २०२६
संग्रामपूर तालुक्यातील हजारो महिलांचे दोन महिन्यांचे अनुदान रखडले आंदोलनाचा इशारा
संग्रामपूर तालुक्यातील अनेक महिलांना अद्यापही “लाडकी बहीण योजना” अंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे अनुदान मिळाले नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ. सुवर्णाताई गणेश टापरे यांनी संग्रामपूर येथील महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून रखडलेली रक्कम तात्काळ वितरित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
तालुक्यातील अनेक महिलांच्या खात्यावर अद्यापही योजनेची रक्कम जमा झालेली नसून, काही महिलांना केवळ अंशतः लाभ मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “लाडकी बहीण” योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, गरजू महिलांसाठी ती मोठा आधार ठरत आहे. मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक पात्र महिला या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सुवर्णाताई टापरे यांनी संबंधित विभागाशी वारंवार संपर्क साधूनही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तालुक्यातील सुमारे ५० टक्के महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने महिलांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. शासनाने तातडीने याची दखल घेऊन प्रलंबित निधी महिलांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना सुवर्णाताई टापरे म्हणाल्या की, “महिलांना न्याय मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन छेडण्यात येईल. तालुक्यातील सर्व महिलांना सोबत घेऊन प्रशासनाला जाब विचारला जाईल.” त्यांच्या या भूमिकेमुळे महिलांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील महिलांच्या हक्कासाठी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सुवर्णाताई टापरे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…..



