महाराष्ट्र शासन कडून सवणा शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- सलमान पठाण सवना चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा सवणा या शाळेची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णय क्रमांक आदर्श 2026/प्र.क्र.22/एसडी/6 दिनांक 27 मार्च 2024 नुसार ही निवड जाहीर करण्यात आली. विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सशक्तीकरण करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील 405 शाळा विकसित करण्यास मंजुरी देण्यात आली असून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शाळेत उपलब्ध होणाऱ्या आधुनिक सुविधा
भव्य इमारतीसह डिजिटल क्लासरूम
सुसज्ज वाचनालय व आधुनिक प्रयोगशाळा
आधुनिक संगणक प्रयोगशाळा
सांस्कृतिक सभागृह
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची फिल्टर सुविधा
सुसज्ज शौचालय
वीज जोडणी व इंटरनेट सुविधा
क्रीडा साहित्य व खेळाच्या सुविधा
बुलढाणा जिल्हा येथील प्राथमिक विभागातून 12 आणि माध्यमिक विभागातून 1 अशा एकूण 13 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सवणा येथील जिल्हा परिषद शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या तोडीचे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निवडीमुळे सवणा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



