खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्ररावेर

गांधी जयंतीनिमित्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचे ‘गांधीजी भजन आंदोलन’

पीक विम्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासह महसूल मंडळ जाहीर करण्याची मागणी; आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर, दि. २ ऑक्टोबर २०२६ :
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून रावेर तहसील कार्यालयासमोर केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी ‘गांधीजी भजन आंदोलन’ करण्यात आले. केळी पीक विम्याची महसूल मंडळनिहाय यादी जाहीर करणे, मंजूर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे तसेच पीक विम्यातून वगळण्यात आलेले क्षेत्र नियमित करणे, या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनस्थळी तालुकाभरातील शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार श्री. संजय तायडे, AIC पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. अमित पवार, तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब वाळके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळांची यादी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच आठवडाभरात सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांचे विमा क्षेत्र कमी दाखविण्यात आले आहे, अशा सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांची प्रोसेसिंग सुरू करण्यात आल्याची माहिती पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही, त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी रावेर येथील विमा कंपनीच्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि आंदोलन स्थगित केले.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या आंदोलनाला युवा शेतकरी सुनील कोंडे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व युवा नेते धनंजय भाऊ चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सुरेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष वाय. एस. महाजन, धुमाभाऊ तायडे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, दिलरुबाब तडवी, गुणवंत भंगाळे, सुधीर मोरे, योगेश कोळंबे, विवेक बोंडे सर, डिगंबर नेहेते, गोपाळ भिरुड, विष्णू भिरुड, सुनील बऱ्हाटे, हेमराज पवार, संदीप भिरुड, मधुकर पाटील, तांदळवाडीचे शशांक पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील यांच्यासह तालुकाभरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता पीक विम्याची रक्कम प्रत्यक्षात खात्यावर जमा होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button