बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्री बालाजी महाराज यात्रा उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा ; ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आणि सर्व भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून श्री बालाजी महाराजांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देऊळगाव राजा येथे येत असतात. यावर्षी यात्रा उत्सवातील घटस्थापना आश्विन शु. १, रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. मंडपोत्सव आश्विन शु. ८ सह ९, सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दसरा पालखी मिरवणूक आश्विन शु. ९ सह १० मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून ते बुधवार, दि. २१ ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. तसेच लळीत उत्सव आश्विन कृ. ४, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी सकाळी ५:४५ वाजता होणार आहे.

आश्विन यात्रा उत्सव दि. ११ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर कार्तिक यात्रा उत्सव दि. १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. यात्रा उत्सवादरम्यान भाविकांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त, राजे विजयंसिंह जाधव आणि व्यवस्थापक, श्री किशोर बीडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक उत्सवांसाठी, श्रींचे सर्व भक्त लगबगीने कामाला देखील लागले आहेत. दरवर्षी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून बातमी, जाहिरात, लेख, संकलित माहिती इत्यादींच्या आधारे, श्रींच्या उत्सवांचा तसेच यात्रेचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणाऱ्या पत्रकारवृंदांकडून यावर्षी सुद्धा प्रचार व प्रसाराच्या नियोजनासाठी, श्री बालाजी संस्थान तर्फे सर्व पत्रकार बंधू व भगिनींच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच श्री बालाजी महाराजांच्या सर्वे नंबर ९८ वरील यात्रेच्या नियोजनासाठी, श्री बालाजी संस्थान पुरस्कृत जागावाटप समितीच्या सदस्यांची अंतर्गत सहविचार सभा आयोजित करण्यात आली.

शासन परिपत्रकांनुसार, यात्रेचा व्यवस्थापन आराखडा व प्रमाणित कार्यपद्धती (SOP) मा.जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करून, त्यामध्ये सर्व संबंधित विभागांची कर्तव्ये व जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच उत्सव व यात्रेच्या परवानगीसाठी, श्री बालाजी संस्थान तर्फे सविस्तर पत्र पाठवून मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button