खानदेशमहाराष्ट्रविदर्भ

सेवा संकल्प अभियानात सोगोडा शाळेचा; समाजजागृतीचा प्रभावी ठसा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

सोगोडा:- २ ऑक्टोबर २०२६
विद्यार्थ्यांच्या नाट्यपथकातून जनकल्याणकारी योजनांचा जागर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
शालेय उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, सोगोडा या शाळेने सेवा संकल्प अभियानात आपल्या गुणवंत विद्यार्थी, कर्तृत्ववान शिक्षक आणि जागरूक नागरिकांच्या सहभागातून समाजजागृतीचा प्रभावी ठसा उमटविला. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात संकल्प यात्रेने करण्यात आली. माननीय तहसीलदार संग्रामपूर श्री. प्रशांत पाटील साहेब, माननीय गटविकास अधिकारी श्री. माधव पायघन साहेब आणि माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. सारंग कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली.
या संकल्प यात्रेदरम्यान जि. प. म. उ. प्रा. शाळा सोगोडा येथील गुणसंपन्न विद्यार्थ्यांनी नाट्यपथकाच्या माध्यमातून गावातील विविध ठिकाणी उत्कृष्ट नाटिका सादर केल्या. आपल्या कलागुणांचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले.
संकल्प यात्रेनंतर सर्व मान्यवरांचे औक्षण व पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारतमातेच्या सेवेसाठी बलिदान देणारे शहीद विठ्ठल सोनाजी बारब्दे यांच्या आई-वडिलांसह सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या वतीने शहीद विठ्ठल सोनाजी बारब्दे यांच्या आई-वडिलांसह सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत शाळास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार श्री. पाटील साहेब, गटविकास अधिकारी श्री. पायघन साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री. कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. राज्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यक्रम आटोपशीर स्वरूपात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सोगोडा शाळेतील विद्यार्थिनींनी आदिवासी गीतावर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक व नागरिकांसाठी शाळेच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. सेवा संकल्प अभियान यशस्वी करण्यासाठी जि. प. म. उ. प्रा. शाळा सोगोडा येथील मुख्याध्यापक, कर्तृत्ववान शिक्षकवृंद, गुणसंपन्न विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी घेतलेले परिश्रम विशेष कौतुकास्पद ठरले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सामाजिक बांधिलकीची जोड देत जनजागृतीचे प्रभावी माध्यम उभे करण्याचा शाळेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.
“आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतात; आदर्श विद्यार्थी आदर्श समाजाची निर्मिती करतात!”
या विचाराला साकार करणाऱ्या सोगोडा शाळेच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button