मुक्ताईनगर येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त २५ परिचारिका व परिचारकांचा गौरव

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघ व योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कृतज्ञता व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ परिचारिका व परिचारकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानून अहोरात्र कार्य करणाऱ्या परिचारिकांच्या सेवेचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कोरोना काळापासून ते आजपर्यंत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या आरोग्यदूतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुक्ताईनगर तालुका संघचालक डॉ. मनोज महाजन उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉक्टरांच्या उपचारांना परिचारिकांच्या मायेची व तत्पर सेवेची जोड मिळाल्याशिवाय रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. समाजासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.”
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, श्रीमती आशाताई चिखलकर, योगमाया प्रतिष्ठान मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष अश्विन सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषभ जोशी यांनी केले.
सोहळ्यास मुक्ताईनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सन्मानित परिचारिका व परिचारकांनी आयोजक संस्थांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुणाल कोळी, यश शिरतुरे, विशाल तेलंग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघ व योगमाया प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



