श्री संत मुक्ताई ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिभावात साजरा होणार

कोथळी-मुक्ताईनगर येथे दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम; संतांच्या पादुका पालख्यांचे भव्य आगमन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-
जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र समाधीस्थळी श्री संत मुक्ताई यांचा ७२९ वा अंतर्धान समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून, या निमित्ताने ४ मे ते १४ मे २०२६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैशाख कृष्ण तृतीया पासून सुरू होणारा हा सोहळा वैशाख कृष्ण द्वादशीपर्यंत चालणार आहे.
आदिशक्ती मुक्ताबाई यांनी सुमारे ७२९ वर्षांपूर्वी विजेच्या कडकडाटात अंतर्धान घेत स्व-स्वरूपात लीन झाल्याची धार्मिक परंपरा सांगितली जाते. त्या वेळी भगवान पांडुरंग, राई-रुख्माई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ तसेच समकालीन संत उपस्थित असल्याचे मानले जाते. याच पवित्र स्थळी मुख्य अंतर्धान सोहळा १२ मे २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी पंढरपूर येथून संत नामदेव महाराज व भगवान पांडुरंगाच्या पादुका पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी, सासवड येथून संत सोपानकाका पादुका सोहळा, तसेच कौंडण्यपूर येथून माता रुख्मिणी पादुका सोहळा आगमन करणार आहेत. तसेच आळंदी व देहू येथील संत संस्थानांचे प्रतिनिधी आणि विविध संत-महंतांच्या उपस्थितीत सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
या निमित्ताने वै. पंढरीनाथ महाराज मानकर यांच्या प्रेरणेने आणि वै. प्रल्हाद महाराज सुळेकर यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. संदिप महाराज खामनीकर करणार आहेत.
दैनिक कार्यक्रमांचे वेळापत्रक :
दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम व मुक्ताई पाठ, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११ ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व आरती आणि रात्री ८.३० ते १०.३० किर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.
मुख्य सोहळ्याचे आकर्षण :
१२ मे रोजी सकाळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या वतीने पांडुरंग, रुख्मिणी तसेच संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे जुने मंदिर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ह.भ.प. केशवदास नामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समाधी सोहळा, पुष्पवृष्टी (गुलाल) किर्तन व आरती पार पडेल. सायंकाळी ६ ते ७ नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळा होणार आहे.
१३ मे रोजी एकादशी निमित्त सकाळी ७ ते १० दरम्यान जुने मुक्ताई मंदिर ते नवीन मंदिर असा भव्य पांडुरंग पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार असून, परिसरातील वारकरी, टाळकरी व भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी ३ मे रोजी सायंकाळपर्यंत आवश्यक साहित्यांसह उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.
याशिवाय आषाढी वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रस्थान २४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता जुने मंदिर येथून होणार आहे.
या संपूर्ण सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, अध्यक्ष ह.भ.प. रविंद्र प्रल्हादराव पाटील तसेच व्यवस्थापक ह.भ.प. उध्दव नारायण जुनारे यांनी केले आहे.



