माता रेणुका देवी यात्रेदरम्यान भक्तांना सर्व सुविधा पुरवा.. आ. सौ. श्वेता महाले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली….. प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे
आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी घेतला तयारीचा सर्वंकष आढावा…
चिखली नगरीची आराध्यदेवता श्री रेणुकादेवी यात्रेची पूर्वतयारी व्यवस्थित होण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आज नगर परिषद कार्यालय, चिखली येथे संबंधित प्रशासकीय अधिकारी व श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त यांची विशेष बैठक घेऊन यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यात्रा निर्विघ्नपणे व सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सर्व निर्देश त्यांनी या वेळी दिले.
शहरात दाखल होणाऱ्या भाविक-भक्तांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, वहन मार्ग सुरक्षित ठेवावा, पोलिस यंत्रणा सतर्क असावी, महिला माता-भगिनींना त्रास होऊ नये व चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा, असे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
वहन मिरवणूक व्यवस्थित पार पाडावी, शहरातील महाप्रसाद व भंडाऱ्यांसाठी गॅस, पाणी व अन्य सुविधा उपलब्ध कराव्यात, नगर परिषदेचे पथक विविध ठिकाणी नेमावे, अग्निशामक दल तत्पर असावे, फिरते स्वच्छतागृह उभारावे तसेच व्यापारी बांधवांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. वहन मार्गावर भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वांना देवीचे दर्शन होईल याची व वहन मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण होईल याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बैठकीत प्रशासनाने केलेल्या तयारीचाही आढावा सादर करण्यात आला. वहनमार्गाची डागडुजी व दुरुस्ती पूर्ण झाली असून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्वच्छता टीम शहरात विविध ठिकाणी तैनात असून तीन अग्निशमन वाहने सुस्थितीत आहेत. वहन मार्गातील अतिक्रमणे हटवण्यात आली असून पथदिवे सुरू असल्याची खात्री करण्यात आली आहे. शहरात दहा ते बारा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.
आ. सौ. श्वेता महाले यांनी यात्रा उत्सवादरम्यान शहरातील सर्व रस्ते व चौरस्त्यांवरील पथदिवे अखंड सुरू राहतील याची दक्षता घेण्याचे, महामानवांच्या पुतळ्यांवर विद्युत रोषणाई करण्याचे, यात्रेपूर्वी एक दिवस आधी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी नगर परिषदेचे दल सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिस प्रशासनाला महिला पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स रूमचे नियमित मॉनिटरिंग करण्याच्या तसेच महिला व बालकांसाठी मदत केंद्र उभारण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यात्रा महोत्सवाच्या अनुषंगाने पुतळ्यापासून दोनशे मीटर परिसरात पादत्राण दुकाने राहणार नाहीत, वहन मार्गातून बांधकाम साहित्य तत्काळ हटवण्यात येईल, मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष पथक तैनात केले जाईल आणि शहरातील नाले व रस्त्यांची स्वच्छता करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दोन एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपासून तीन एप्रिलपर्यंत फिरते शौचालय, केरकचरा उचलणे व पाणी टँकरची व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीस नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, ठाणेदार भूषण गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, नगर परिषद उपाध्यक्षा सौ. वैशालीताई कपिल खेडेकर, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप, रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष गोपाल अप्पा शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे यांच्यासह नगरसेवक, सभापती आणि संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



