संग्रामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ! हरिणाची शिकार, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २१ मार्च २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा–टुणकी परिसरात 19 ते 20 मार्च 2026 च्या दरम्यान रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका हरिणाची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. जंगलालगतच्या शेत परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांना हरिणाचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला बिबट्याने केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, संबंधित प्राणी अजूनही परिसरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेनंतर सोनाळा, टुणकी आणि आसपासच्या गावांमध्ये नागरिकांनी रात्री बाहेर पडणे टाळले असून शेतात जाताना समूहाने जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच जनावरांच्या सुरक्षेबाबतही खबरदारी घेतली जात आहे. वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संग्रामपूर तालुका जंगलालगत असल्यामुळे वन्य प्राण्यांची वर्दळ अधूनमधून आढळते, मात्र अलीकडील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे….



