अंतुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या संपन्न

अंतुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या संपन्न
(वार्ताहर – स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, मुक्ताईनगर)
(ता. मुक्ताईनगर) अंतुर्ली– समाजातील दुर्बल व गरजू नागरिकांसाठी आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या हेतूने अंतुर्ली येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराचे आयोजन श्री साई नेत्रालय व संशोधन केंद्र, जळगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, चष्मा वितरण तसेच मोतीबिंदूचे निदान व उपचार करण्यात आले. निदान झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना पुढील उपचारांची सोयही संस्थेकडून केली जाणार आहे.
शिबिरात तज्ञ नेत्रतज्ज्ञांनी उपस्थित नागरिकांना डोळ्यांची काळजी, योग्य आहार, नियमित तपासणीचे महत्त्व आणि डोळ्यांच्या आजारांपासून बचाव याबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे वृद्ध नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरली.
या शिबिराचे उद्घाटन स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाले. सामाजिक बांधिलकी जपत अशा आरोग्य उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याचे कार्य स्तुत्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक संस्था, वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



