जळगावा जिल्हामहाराष्ट्र

बिबट्याची दहशत कायम; गोठ्यात बांधलेल्या वासराचा पाडला फडशा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याची दहशत अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उपद्रव कमी झाला होता, मात्र गुरुवारी (ता. १७) वरखेडे-दरेगाव रस्त्यावरील एका शेतात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

वरखेडे येथील दरेगाव रस्त्यालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात जनावरांसाठी बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने गोठ्याची जाळी तोडून वासराला बाजूच्या शेतात ओढून नेले आणि त्याचा फडशा पाडला. हल्ला केल्यानंतर बिबट्याने डरकाळी देखील फोडल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, त्यानंतर शेतकरी पाटील यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील परिस्थिती आणि वासराला ओढून नेल्याच्या खुणांवरून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री झाली आहे. बिबट्याने वासराचा फडशा पाडलेल्या ठिकाणी गुरांच्या चाऱ्याचा शिल्लक भाग दिसून आला.

दरम्यान, चाळीसगाव परिसरातील विविध भागांमध्ये अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत असल्याने पशुधनावरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वरखेडे शिवारात एका शेतात पाण्याच्या हौदात बिबट्या आढळून आला होता. यानंतर आता गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे. सध्या शेतांमध्ये कांदा काढणीचे काम सुरू आहे, परंतु बिबट्याच्या धास्तीमुळे शेतकरी आणि मजूर रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धजावत नाहीत. यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे आणि इतर महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. या घटनांची माहिती मिळताच वनविभागाने परिसरात गस्त वाढवली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये पसरलेली भीती लक्षात घेता, बिबट्याला पकडण्यासाठी लवकरच पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button