जळगावा जिल्हासंपादकीय

महापालिका आयुक्त ढेरेंची तातडीने हकालपट्टी करा..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव

दिनांक 12 डिसेंबर 2024

जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे सध्या महापालिकेचे प्रशासक म्हणून संपूर्ण महापालिकेचा प्रमुख म्हणून कारभार पाहत आहेत. गेले वर्षभर महापालिकेत शासकीय राजवर प्रशासकीय राजवर सुरू आहेत. नगरसेवकांच्या गटबाजीमुळे विकास कामात प्रशासनाला अडचणी येतात असे वाटत होते. त्यामुळे प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींकडे बोट दाखवून आपण नामनिराळे होत असत. परंतु वर्षभर प्रशासकीय राजवट असताना विकास कामे तसेच जनतेची कामे सुरळीत होण्याऐवजी ‘पैसे मोजल्याशिवाय अधिकारी कामेच करीत नाहीत’, असा अनुभव येत आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागात अनेक कामे पेंडिंग आहेत. नगररचना विकासात सुमारे ७०० ते ८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. नियमानुसार होणारी कामे सुद्धा काही तरी त्यात कारण दाखवून प्रलंबित ठेवण्यात येतात. त्या कामांना प्रलंबित ठेवण्यामागचा उद्देश काय आहे? याची आता जनतेला कल्पना आलेली आहे. तसेच प्रकार बांधकाम विभागातही दिसून येतात.

बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते. नगररचना विभागातील सहाय्यक नगर रचना अधिकारी मनोज वडनेरे यांना लाचलुचपत खात्याकडून १५ हजाराची लाज घेताना रंगेहात सोमवारी पकडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून एसीबीने त्यांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. त्यांची एसीबीने चौकशी केली, तेव्हा मनोज वडनेरे यांनी एसीबीला जी माहिती दिली ती अत्यंत गंभीर अशी म्हणावी लागेल. “महापालिका आयुक्तांना पैसे द्यावे लागतात म्हणून आम्हाला पैसे घ्यावे लागतात..!” हे वडनेरे यांनी जबाबात दिलेले उत्तर अत्यंत गंभीर आहे. याचा अर्थ महापालिका आयुक्त आणि प्रशासक असलेले ज्ञानेश्वर ढेरे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हप्ते वसूल करतात का? हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.

गेले तीन दिवस लागोपाठ ज्ञानेश्वर ढेरे यांची एसीबी कडून चौकशी होते आहे. ‘शेताच्या रक्षणासाठी तयार केलेले कुंपणच शेत खातेय’ अशातला हा प्रकार म्हणता येईल. आयुक्त म्हणून लाखो रुपयांचा मासिक पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी हप्ते वसुली करावी? हे दुर्दैव म्हणावे लागेल. गलेलठ्ठ पगार असताना प्रशासनाचे प्रमुख म्हणून जनतेची कामे करण्या ऐवजी त्यांनी त्या कामांना खिळवून हप्ते वसुलीच्या जाचेवर डोळा आहे. अशा प्रतिनिधींची त्या पदावरून तातडीने हकलपट्टी करणे आवश्यक आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे म्हणतील, “मी हप्ते वसूल करतोय हे सिद्ध झाले आहे काय?”, “हा माझ्यावर अन्याय आहे..” वगैरे.. वगैरे.. ते तारे तोडतील.. तथापि ‘विस्तव आहे, तिथेच धूर निघतो’ हे विसरता येणार नाही.. सहाय्यक नगररचना अधिकारी मनोज वडनेरे यांनी उगाच आरोप केले आहेत काय? आपल्या बॉसवर आरोप केल्यानंतर त्यात काही तरी काळेबेरे आहे, हे स्पष्ट दिसते.

एसीबीच्या चौकशीतून पुराव्या अभावी ज्ञानेश्वर ढेरे सहीसलामत सुटतीलही.. परंतु ज्यांचे विरोधात संशयाची पाल चुकचुकते आहे, तेथे संशय वाढत राहतो. त्यामुळे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची तातडीने बदली करून सक्षम अशा आयुक्तांची त्या जागी नियुक्ती केली, तरच महापालिका प्रशासनामध्ये सुधारणा होऊन सर्व विभागीय अधिकारी आणि कर्मचारी वठणीवर येतील. अन्यथा भ्रष्टाचाराला रान मोकळे होईल..

जळगाव शहराला तसेच जिल्ह्याला योग्य प्रतिनिधींच्या नेतृत्वा अभावी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे फावते आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतील प्रशासनाच्या कारभारावर कुणाचा वचकच नाही. जळगाव शहरातील महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघात वाढत आहेत. त्यासाठी महामार्गाला समांतर रस्त्यांचा प्रश्न अतिक्रमणामुळे प्रलंबित आहे. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असताना ‘ती का काढली जात नाहीत?’ अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर कुणाचा वचक नाही.. निष्पक लोकांचे प्राण अपघातात जात आहे. त्याचे प्रशासनाला कसलेही सोयरे सुतक नाही. गेल्या तीन वर्षापासून भुसावळ रोडवरील खेडी येथील डीपी रोडचा रस्ता मंजूर झाला होता, परंतु भर रस्त्यावरील अतिक्रमणाचे कारण देऊन बांधकाम विभाग चालढकल करत आहे.

बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, नगर रचना विभाग एकमेकांवर चालढकल करून तीन वर्ष रस्ता प्रलंबित ठेवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांचे बोर्ड लावून आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. परंतु विधानसभा निकाल लागले तरी अद्याप त्या कामाला सुरुवात झालेली नाही. मनपा प्रशासनाची ही ‘कार्यक्षमता की अकार्यक्षमता’ यावरून प्रशासनाच्या गतिमानतेची कल्पना येते. नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर केली आहे, असे कधीच होत नाही. हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे ठाण्याहून जळगाव मध्ये रुजू झाले. त्यांच्यासमोर आव्हानांचे मोठे डोंगर असल्याचे माध्यमांनी दाखवून दिले होते. त्यांच्याकडून प्रशासक व आयुक्त म्हणून फार मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि या सर्व फोल ठरल्या. ढेरे यांची निवृत्ती जवळ आलेली आहे. निवृत्तीच्या वाटेवर असलेले अधिकारी नेहमी जळगावच्या पाचवीला पुजलेले आहेत. सेवानिवृत्ती जवळ आल्याने त्यांचे ‘कामां’ऐवजी ‘अर्था’कडे लक्ष असते. त्यामुळे जळगाव शहराचे वाटोळे होत आहे. त्यासाठी आयएएस दर्जाचा तरुण तडफदार अधिकारी जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आल्याशिवाय जळगाव शहराची पर्यायाने जळगावकरांची सुधारणा होणार नाही.

अन्यथा जळगाव शहराचे वाटोळे होईल. नवीन महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात अस्तित्वात आले आहे. त्यातून त्यांचे नेतृत्वात मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. कार्यक्षम आयुक्त जळगाव पालिकेला मिळावा हीच अपेक्षा…!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button