स्वच्छता कामगारांची दुसरी दिवाळीही अंधारातच

कवडीमोल मोबदला देऊन आर्थिक शोषण
हिवरखेड :-
सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम असून उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण आपापल्या परीने दिवाळीसाठी खरेदी करत आहेत. परंतु दिवाळीच्या सणालाही हिवरखेड नगर परिषद मधील स्वच्छता कामगार महिला पुरुषांचे मात्र दिवाळं निघाल आहे.
हिवरखेड नगरपरिषद निर्मितीला पावणे दोन वर्षे होत आहेत. शासनाकडून हिवरखेड नगर परिषद साठी कोट्यावधी रुपयांचा आकृतीबंध सुद्धा मंजूर झालेला आहे. सदर आकृतीबंध आम्हीच मंजूर करून आणला असा श्रेयवाद लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुद्धा अनेक लोकप्रतिनिधींनी केला.
परंतु येथील स्वच्छता कामगारांना अद्यापही ग्रामपंचायत नुसार 75 रुपये शिफ्ट प्रमाणे कवडीमोल मोबदला मिळतो. जर दोन शिफ्ट मिळून रोज आठ घंटे काम केल्यास फक्त दीडशे रुपये मिळतात. कायद्याने रविवारची सुट्टी हक्काची असली तरी महिन्यातील चार ते पाच रविवार चे पैसे सुद्धा कापल्या जातात. म्हणजे कोण्या कामगाराने समजा एकच शिफ्ट महिनाभर काम केले तर रविवारच्या सुट्ट्याचे पैसे कापून त्याच्या हाती महिन्याचे पूर्ण दोन हजार रुपये सुद्धा पडत नाहीत. दोन्ही शिफ्ट निरंतर काम करूनही 4 हजार सुद्धा पगार मिळत नाही. त्यातही हाताने घमेल्यात मैला उचलणे, गटारात उतरून जीव धोक्यात घालून सफाई यासारखी कामे करावी लागतात. असे भीषण वास्तव स्वच्छता कामगारांनी विषद केले.
दैनंदिन आठ तास सफाई कामगारांना काम करावे लागत आहे. ग्रामपंचायतचे नगरपरिषद झाल्यावर पावणे दोन वर्षे होऊनही स्वच्छता कामगारांना (किमान वेतन) पगार वाढ झालेली नाही. अथवा नगरपरिषद मध्ये आकृती बंधानुसार स्थायी स्वरूपात सामावून घेण्यात आलेले नाही. चार रविवारचे पैसे सुद्धा कापण्यात येतात. शासनाच्या नियमानुसार आकृतीबंधात सामावून घेण्यात यावे तसेच उर्वरित कामगारांना किमान वेतन लागू करावे आणि रविवारच्या सुट्टीचे पैसे कापण्यात येऊ नये असे स्वच्छता कामगारांचे म्हणणे आहे. नगरपरिषद मध्ये तात्काळ नगरपरिषदेच्या पगारानुसार त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी असेही कामगार म्हणाले. राज्यातील इतर नगर परिषदां मध्ये स्वच्छता कामगारांना ज्या सुविधा सोयी सवलती साहित्य मिळतात त्या सर्व सोयी सुविधा आणि पगार हिवरखेड येथील स्वच्छता कामगारांना सुद्धा मिळावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.
स्वच्छता कामगारांकडून नगरपरिषद ला आजपर्यंत अनेकदा निवेदने आणि तोंडी मागण्या केलेल्या आहेत. त्या परंतु तरीही त्यांच्या कोणत्याही मागण्या अद्याप मान्य झाल्या नसून त्या कधी पूर्ण होतील अशी त्यांना चिंता लागली आहे. दिवाळीला कोणताही बोनस, कपडे, अथवा वाढीव पगार सुद्धा मिळाला नाही अशी खंत सुद्धा कामगारांनी व्यक्त केली.
दिवाळीचा सण आला असून कवडीमोल मोबदल्यात दिवाळीचा सण साजरा करावा तरी कसा असा प्रश्न स्वच्छता कामगारांसमोर पडला आहे.
प्रतिक्रिया:-
मी जवळपास चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्य करीत आहे. परंतु अजूनही आम्हाला रोजंदारीवरच समजले जात असून तुम्ही कायमस्वरूपी नसल्याचे अधिकारी म्हणतात. 23 स्वछता कामगारांचा आकृतीबंध मंजूर असूनही एकाही स्वछता कामगाराला समायोजित करण्यात आलेले नाही. 35 च्या जवळपास कामगार असून एकालाही किमान वेतन मिळत नाही. कवडीमोल मोबदला देऊन सर्व स्वच्छता कामगारांचे नगरपरिषद कडून आर्थिक शोषण केल्या जात आहे.
कौशल्या भानुदास तेजवाल महिला स्वच्छता कामगार हिवरखेड नगरपरिषद.
याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हिवरखेड नगर परिषद चे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांना फोन केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.
फोटो :- व्यथा मांडताना महिला सफाई कामगार तथा गटारात उतरून स्वच्छता करताना सफाई कामगार दिसत आहे.



