खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणाभुसावळमहाराष्ट्र

सोलर सिस्टीमच्या रिलीज ऑर्डरसाठी दोन हजारांची लाच; महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

रिलीज ऑर्डर देण्यासाठी लाचेची मागणी महागात; भुसावळात महावितरण अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

भुसावळ | प्रतिनिधी

सोलर सिस्टीम बसविण्यासाठी आवश्यक मंजुरी व रिलीज ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या भुसावळ शहर-१ कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अभिमन्यू पाटील (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (दि. २२) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरणच्या भुसावळ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसविण्याची एजन्सी असून भुसावळ शहरातील दोन ग्राहकांनी त्यांच्याकडून सोलर सिस्टीम खरेदी केली होती. संबंधित ग्राहकांच्या वतीने महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करून सोलर सिस्टीम बसविण्याची मंजुरी आणि रिलीज ऑर्डरची मागणी करण्यात आली होती. या अर्जांची तपासणी करून मंजुरी देण्याची जबाबदारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्याकडे होती.

मात्र, अर्ज प्रलंबित राहिल्याने तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये, अशा एकूण दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईचे पर्यवेक्षण एसीबी, जळगावचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. सापळा अधिकारी म्हणून नंदुरबार एसीबीच्या पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी काम पाहिले. पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलिस हवालदार संगीता पवार आणि पोलिस हवालदार बाळू मराठे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून पुढील तपास पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button