सेवासंकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त क्षय व कुपोषण जनजागृती कार्यक्रम उत्साहात;क्षयरुग्णांसाठी पोषणयुक्त आहार, उपचारातील सातत्य व स्वच्छतेबाबत जनजागृती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. ३० : सेवा संकल्प अभियान व राष्ट्रीय पोषण माह निमित्त क्षयरोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये पोषण, योग्य आहार, स्वच्छता, नियमित उपचार आणि क्षयरोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्षय आरोग्य धाम, बुलढाणा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “सुपोषणातून सुदृढ आरोग्य आणि क्षयरोगमुक्त समाज” या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयीन कर्मचारी तसेच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आहारतज्ज्ञांच्या वतीने विविध पोषणयुक्त अन्नपदार्थांची प्रदर्शनी मांडण्यात आली. डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आहारतज्ज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी कुपोषण व क्षयरोग यांचा संबंध, क्षयरुग्णांसाठी आवश्यक पोषणमूल्ये, संतुलित आहार, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक अन्नघटक तसेच उपचारादरम्यान योग्य आहाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
क्षयरोगाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी व नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी रांगोळी, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन आणि भूमिकानाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी क्षयरोग जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले.
यावेळी क्षयरुग्णांना विविध स्वरूपाची मदत करण्यात आली. परिसेविका मीना जोंधळे यांच्या वतीने पेंडखजूर, मुकादम रामनंदन चव्हाण यांच्या वतीने प्रोटीन पावडर, अधिपरिचारक ज्ञानोबा चाटे यांच्या वतीने केळी, तर सहाय्यक अधिसेविका संगीता वुईके यांच्या वतीने औषधे ठेवण्यासाठी डबे रुग्णांना देण्यात आले. या साहित्याचे वितरण डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. सुशील चव्हाण तसेच वरिष्ठ लिपिक दत्तात्रय वाघमारे यांनी क्षयरोग विषयावर स्वरचित कविता सादर केली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
क्षयरोगातील योग्य आहार, घ्यावयाची काळजी, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता, औषधोपचाराचे महत्त्व आणि उपचारातील सातत्य याबाबत जनजागृती करणारे विविध व्हिडिओ यावेळी रुग्ण व नातेवाईकांना दाखविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहारतज्ज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहाय्यक अधिसेविका श्रीमती संगीता वुईके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचारी, मुकादम रामनंदन चव्हाण व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. पोषण, योग्य आहार आणि नियमित उपचार यांच्या माध्यमातून क्षयरुग्णांचे आरोग्य सुधारण्यासोबतच कुपोषणमुक्त व क्षयरोगमुक्त समाजनिर्मितीसाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.



