स्टार भारत लाइव एक्सप्रेसअकोट प्रतिनिधि(शाकिर अहमद पत्रकार)

आलमपूर शिवारात विद्युत तारेच्या घर्षणामुळे भीषण आग; शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान
तालुक्यातील आलमपूर शिवारात विद्युत तारेच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याची शेतातील झोपडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेताजवळून जाणाऱ्या विद्युत तारा एकमेकांवर आदळल्याने ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतातील झोपडीला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत झोपडीतील सर्व शेती साहित्य जळून खाक झाले.
या आगीत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ठिबक (ड्रिप) संचाचे बंडल, पाच संत्र्याची झाडे, एक सीताफळाचे झाड तसेच दोन आंब्याची झाडे आगीत होरपळून नष्ट झाली. यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने संपूर्ण नुकसान टाळणे शक्य झाले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुने व सैल झालेले विद्युत तारे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे



