सिंदखेडराजा येथे आमदार मनोज कायंदे यांच्या उपस्थितीत ‘अहिल्या संदेश यात्रे’चा उत्साहात शुभारंभ!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : शंकर शिवरकर
सिंदखेडराजा:मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून धनगर समाज महासंघाच्या वतीने आयोजित ‘अहिल्या संदेश यात्रे’चा शुभारंभ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला.
माँ जिजाऊंना अभिवादन आणि यात्रेचा प्रारंभ
यात्रेच्या सुरुवातीला आमदार मनोज कायंदे यांनी मातृतीर्थावर राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केले. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून या संदेश यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांनी केलेली समाजसेवा जनतेपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
सुशासनाचा आदर्श आणि खरी आदरांजली
याप्रसंगी बोलताना आमदार मनोज कायंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून सुशासन, समाजकल्याण, महिला सक्षमीकरण आणि लोकसेवेचा एक महान आदर्श देशासमोर निर्माण केला आहे. त्यांच्या याच क्रांतिकारी विचारांचा आणि लोककल्याणकारी कार्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.या सोहळ्याला धनगर समाज महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सिंदखेडराजा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



