राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा… आ.श्वेता महाले पाटील.

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली l तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
आ.श्वेता महाले यांची बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..
राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक सन्मान वाढविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाचा हा विषय आता प्रशासकीय पातळीवर पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक स्थळामुळे बुलढाणा जिल्ह्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांच्या या अतुलनीय योगदानाला कायमस्वरूपी अभिवादन म्हणून जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल
आमदार श्वेता महाले यांनी सादर केलेल्या निवेदनात बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनविषयक वैशिष्ट्येही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर, मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य तसेच विविध धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे बुलढाणा जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे.या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले, ही बाब या मागणीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
राजमाता जिजाऊंच्या नावाने जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ‘राजमाता जिजाऊनगर’ नामकरणाचा मार्ग प्रशासकीय प्रक्रियेतून पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि त्यांच्या महान कार्याला अभिवादन म्हणून बुलढाणा जिल्ह्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ हे नाव मिळावे, ही माझी मनापासूनची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार,” असे आमदार श्वेता महाले पाटील यांनी म्हटले आहे.
यामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे…✍️



