Uncategorized

158 पक्ष रिंगणात; ठाकरेंचे 99 टक्के उमेदवार कोट्यधीश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुंबई

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी उद्या बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण 158 लहान-मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी सहा मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडीचा भाग आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली होती. तेव्हा भाजपने 105, तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या. भाजप-शिवसेना सहज सत्तेवर येऊ शकले असते, पण मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली. मोठ्या राजकीय गोंधळानंतर 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, जो राजकीय इतिहासात ‘पहाटेचा शपथविधी’ म्हणून गाजतो. मात्र बहुमत चाचणीपूर्वीच 26 नोव्हेंबरला दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.सुमारे अडीच वर्षांनंतर शिवसेनेत आणि त्याच्या वर्षभरानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी होऊन दोन्ही पक्ष चार पक्षांमध्ये विभागले गेले.

कोण किती जागा लढत आहे?

महायुती

भाजप – 149

शिवसेना – 81

राष्ट्रवादी – 59

महाविकास आघाडी

काँग्रेस – 101

शिवसेना (उबाठा)- 95

राष्ट्रवादी (शरद पवार) – 86

इतर – 06

गुन्हेगारी पार्श्वभूमी

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) ने यापैकी 2 हजार 201 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जवळपास 29 टक्के म्हणजेच 629 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी 412 जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 50 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत.

ठाकरे गटाचे 99 टक्के उमेदवार कोट्यधीश

भाजप – 149 पैकी 144

शिवसेना – 81 पैकी 79

राष्ट्रवादी – 59 पैकी 58

काँग्रेस – 101 पैकी 94

शिवसेना (उबाठा)- 95 पैकी 94

राष्ट्रवादी (शरद पवार) – 86 पैकी 80

26 उमेदवारांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे जाहीर केले आहे

टॉप 3 श्रीमंत उमेदवार भाजपचेच

पराग शाह (घाटकोपर पूर्व) भाजप – 3 हजार 383 कोटी

प्रशांत ठाकूर (पनवेल) भाजप – 475 कोटी

मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) भाजप – 447 कोटी

दहा जण आहेत अशिक्षित

सुमारे 686 उमेदवारांचे वय 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. 317 उमेदवार 61 ते 80 वर्षे वयोगटातील आहेत, तर दोघे उमेदवार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. या 2 हजार 201 पैकी फक्त 204 महिला उमेदवार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहता, 47 टक्के जणांचे शिक्षण पाचवी ते बारावीच्या दरम्यान आहे. 74 उमेदवार डिप्लोमा धारक, 58 साक्षर, तर दहा जणांनी स्वत:ला अशिक्षित म्हणून घोषित केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button