सिंदखेडराजा मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती; आमदार मनोज कायंदे धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देउळगाव राजा :महाराष्ट्र राज्यासह सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची तीव्र टंचाई आणि शेतकऱ्यांमधील वाढती चिंता लक्षात घेता, मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी मुंबईत धाव घेत थेट मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची भेट घेतली. “शेतकरी बांधवांनो, धीर सोडू नका, तुमचा संघर्ष हा माझा संघर्ष असून प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा शब्द आमदार कायंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी मुंबईत विविध विभागांच्या मंत्र्यांची भेट घेऊन खालील मागण्यांसाठी निवेदने दिली आणि सकारात्मक चर्चा केली
कोरडा दुष्काळ व कृत्रिम पावसाची मागणी
राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन सिंदखेडराजा मतदारसंघासह संपूर्ण भागात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
पाणी पुरवठा योजनांना गती
दुष्काळाची आगामी दाहकता ओळखून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यात आली. मतदारसंघातील अपूर्ण अवस्थेत असलेल्या पाणी पुरवठा योजना युद्धपातळीवर आणि तात्काळ पूर्ण कराव्यात, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
शेतकरी कर्जमाफी व अडचणींवर मार्ग
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून सध्या सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. तसेच कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर तात्काळ मार्ग काढण्याचे निवेदन त्यांना देण्यात आले.
‘तुमच्या हक्कासाठी माझा लढा सुरूच राहील'”
शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना आवश्यक ती मदत, सवलती आणि पिकांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. संकट कितीही मोठे असले तरी आपण सर्वजण एकजुटीने त्याचा सामना करू. बळीराजाने अजिबात धीर सोडू नये, आशा सोडू नये; तुमच्या हक्काचा लढा आम्ही शेवटपर्यंत लढू,” असा ठाम विश्वास आमदार मनोज कायंदे यांनी व्यक्त केला आहे.



