बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे; यांची पुन्हा निवड, शिंगणे यांचे वर्चस्व कायम तर घाटाखालील गोविंदराव मिरगे यांची उपाध्यक्षपदी निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली दि.९.
बुलढाणा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर आज दि.९ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड आज पार पडली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तसेच गोविंदराव मिरगे यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ची निवडअविरोध पार पडली. अध्यक्षपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी गोविंदराव मिरगे यांची अविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता बँकेच्या सर्वोच्च पदाची सूत्रे पुन्हा डॉ. शिंगणे यांच्या हाती आल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात त्यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

डॉ. शिंगणे यांचा राजकीय प्रवास पाहता या निवडीला केवळ सहकार क्षेत्रातील निर्णय म्हणून पाहणे कठीण आहे. एकीकडे महायुतीतील विविध पक्षांचे नेते बँकेच्या संचालक मंडळात आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित असलेल्या डॉ. शिंगणे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या राजकारणातील पक्षीय समीकरणे आणि व्यापक राजकीय गणिते यांची सांगड या निवडीत घातली गेल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे बँकेच्या संचालक मंडळात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मंत्री आकाश फुंडकर यांच्यासारखे प्रमुख नेते असतानाही अध्यक्षपदासाठी त्यांच्याकडून दावा करण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. शिंगणे यांच्यासाठी अध्यक्षपदाचा मार्ग सोपा झाला .ही अविरोध निवड सर्वपक्षीय सहमतीचे उदाहरण जरी असले ,. तरी भविष्यकाळासाठी हा राजकीय डाव तर नाही ना… , याचे उत्तर मात्र आगामी काळातच स्पष्ट होणार असून त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा बँकेशी असलेले नाते केवळ विद्यमान निवडीपुरते मर्यादित नाही. त्यांनी यापूर्वीही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे वडील सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे आणि मातोश्री स्व. प्रभावतीकाकू शिंगणे यांनीही या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे शिंगणे कुटुंबाचा जिल्हा बँकेच्या नेतृत्वाशी असलेला दीर्घकाळाचा संबंध या निवडीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

अलीकडील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील राजकीय चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शिंगणे यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी झालेली पुनर्निवड त्यांच्या राजकीय पुनर्स्थापनेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. महायुतीतील नेत्यांच्या सहमतीने शरद पवार गटाशी संबंधित नेत्याला सहकारातील महत्त्वाचे पद मिळणे, ही बाब आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाची मानल्या जात आहे.
मात्र, या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी त्याला अधिकृत दुजोरा नाही. एवढे मात्र स्पष्ट आहे की, जिल्हा बँकेच्या माध्यमातून डॉ. शिंगणे यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आता या पदाचा वापर ते सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी करतात की त्यातून जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

घाटावर-घाटाखाली समतोल

बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात घाटावर आणि घाटाखाली हा भौगोलिक संदर्भ अनेकदा महत्त्वाचा ठरतो. जिल्हा बँकेच्या नव्या सत्ताकारणातही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. अध्यक्षपदी घाटावरचे डॉ. राजेंद्र शिंगणे, तर उपाध्यक्षपदी घाटाखालील गोविंदराव मिरगे यांची निवड झाल्याने बँकेच्या नेतृत्वात दोन्ही भौगोलिक पट्ट्यांचा मेळ साधला गेला आहे. ही रचना केवळ योगायोग म्हणायचा की संचालक मंडळातील विविध गटांना सोबत घेऊन राजकीय खेळी तर नसेल ना… याची चर्चा आता सुरू
असून जिल्ह्यात त्यांच्या निवडीचाआनंद व्यक्त होत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button