सावन सेलच्या माध्यमातून महिलांच्या उद्योजकतेला बळ; राजस्थानी महिला मंडळाच्या ३१ वर्षांच्या परंपरेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शंकर शिवरकर
देऊळगाव राजा | प्रतिनिधी
महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देत स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखविणाऱ्या राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३१ व्या ‘सावन सेल’ला देऊळगाव राजा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकाच छताखाली विविध प्रकारच्या महिलांनी तयार केलेल्या व विक्रीसाठी आणलेल्या वस्तूंमुळे हा मेळा महिलांच्या कौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.
यंदाच्या सावन सेलमध्ये तब्बल ३५ स्टॉल्स उभारण्यात आले होते. संभाजीनगर, जालना, खामगाव, यवतमाळ, सिल्लोड, इंदोर तसेच इतर शहरांतील महिलांनी आपल्या उद्योगांचे स्टॉल्स लावून सहभाग नोंदविला. ज्वेलरी, बांगड्या, आकर्षक कपडे, देवांचे वस्त्र, कृत्रिम दागिने, घरगुती उपयुक्त साहित्य, उत्कृष्ट भांडी, यंत्रसामग्री, रांगोळी साहित्य, खाद्यपदार्थ अशा विविध वस्तूंनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या सावन सेलचे उद्घाटन तहसीलदार सौ. वैशाली डोंगरजाळ, मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा तथा दैनिक देशोन्नतीच्या पत्रकार सुषमा राऊत आणि शिवसेना नेत्या सौ. भाग्यश्री खेडेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी तहसीलदार सौ. वैशाली डोंगरजाळ यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, “महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. अशा सावन सेलच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी मिळते. एका छताखाली विविध उद्योजिका एकत्र येऊन आपल्या कर्तृत्वाचा परिचय करून देतात, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे,” असे सांगितले.
सौ. भाग्यश्री खेडेकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत, “महिला एकमेकींना प्रोत्साहन देत पुढे जातात. अशा कार्यक्रमांमधून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि आत्मविश्वास वाढतो,” असे मत व्यक्त केले.
सुषमा राऊत यांनी आपल्या मनोगतात, “देऊळगाव राजा शहरात महिला उद्योजकतेची भक्कम पायाभरणी करण्याचे कार्य राजस्थानी महिला मंडळाने केले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून अशा मंडळांमुळे नव्या उद्योजिकांना प्रेरणा व संधी मिळते,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संगीता बिपीन मल्लावत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मंडळाने यंदा ३१ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्याचा अभिमान व्यक्त करत महिलांच्या सातत्यपूर्ण सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा मल्लावत यांनी केले, तर सौ. शोभा राठी यांनी आभार मानले.
राजस्थानी महिला मंडळाच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षा सौ. कल्पना धन्नावत, सौ. शारदा मल्लावत, सौ. मीना निमोडिया, कोषाध्यक्ष, सचिव सौ. शिल्पा मल्लावत, सौ. पुनम धन्नावत, सौ. शोभा राठी, सौ. प्रभा काबरा, सौ. शीतल लोहिया, सौ. रेखा सराफ, सौ. सपना बुरावत, सौ. दिपाली गोलेच्छा आणि सौ. कविता बाहेती यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत स्वावलंबनाची प्रेरणा देणारा हा सावन सेल देऊळगाव राजा शहरातील महिलांच्या उद्योजकीय चळवळीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.



