सायंकाळी तीनच्या सुमारास सवना गावात घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास, चोरट्यांच्या चप्पला व पाण्याची बाटली घटनास्थळीच

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण
चिखली तालुक्यातील सवना गावात सायंकाळी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश करत चोरी केल्याची घटना घडली. चोरट्यांनी घरातील कपाटे, बॅगा व इतर साहित्याची उचकापाचक करून सुमारे तीन ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. घरफोडीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली असता सायंकाळी तीनच्या दरम्यान तीन संशयित व्यक्ती परिसरात फिरताना दिसून आल्या. त्यांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, चोरी करून पळून जाताना चोरटे स्वतःच्या वापरातील चप्पला तसेच पाण्याची बाटली घटनास्थळीच विसरून गेले. या वस्तू तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे ठरण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे सवना गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



