श्री शिवाजी महाविद्यालयात मुलींसाठी दोन दिवसीय आत्मसुरक्षा व जनजागृती शिबिर

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली : श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने मुलींच्या सुरक्षिततेसाठी व स्वसंरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय ‘मुलींची आत्मसुरक्षा व जनजागृती शिबिर’ आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून एम. ए. क्रीडा अकादमीचे संचालक कराटे , बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. असलम हिरीवाले तसेच कराटे प्रशिक्षक व ब्लॅक बेल्ट प्राप्त श्री. गणेश जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी आत्मसुरक्षेची विविध तंत्रे, स्वसंरक्षणाच्या पद्धती, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, आत्मविश्वास वाढविणे तसेच दैनंदिन जीवनातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुक्ति जाधव यांनी केले. त्यांनी अंतर्गत तक्रार निवारण समितीची भूमिका, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. आर. पडोळे यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला महाविद्यालयाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले. कोणत्याही प्रकारचा छळ, गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार घडल्यास विद्यार्थिनींनी न घाबरता अंतर्गत तक्रार निवारण समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
या शिबिराला सुमारे १०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम वैद्य यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दीक्षा साळवे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत तक्रार निवारण समितीचे डॉ. मुक्ति जाधव (संयोजक), डॉ. सोनाली गायकवाड (आयोजन सचिव), डॉ. एस. आय. जुक्कलकर, श्री. संदीप गवई, श्रीमती शीला खिल्लारे तसेच आयोजन समितीचे सदस्य प्रा. शरद पवार, प्रा. तृप्ती श्रीरामे, प्रा. प्रतिभा चिखले, प्रा. प्रियंका चव्हाण, प्रा. नीता उभे, डॉ. शिल्पा देशमुख, प्रा. स्नेहा काळे, प्रा. अंजली राजपूत आणि प्रा. सोमेश लोडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविणारा हा उपक्रम ठरला



