शिवनी आरमाळसह अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार?

धरणांवर मोटारींची तपासणी करा; भरारी पथकाने सक्रिय होऊन संभाव्य पाणीटंचाई रोखावी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : तालुक्यातील शिवनी आरमाळसह अंढेरा परिसरातील धरणांमधून मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसा होत असल्यास, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांनी गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन, मोटारींची तपासणी आणि अनधिकृत पाणी उपशावर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
धरणातील पाणी उपसा अधिकृत परवानगीने सुरू आहे की अनधिकृतपणे, याची जलसंपदा किंवा संबंधित सिंचन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी. अनधिकृत मोटारी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. महसूल विभाग आणि पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त तपासणी करून कारवाईचा अहवालही सार्वजनिक करावा.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन आधीच नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिवनी आरमाळसह अंढेरा परिसरातील धरणांवर भरारी पथकाने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबंधित विभागांनी पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



