सगोडा येथे”सेवा संकल्प अभियानांतर्गत’विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी भव्य आरोग्य शिबिर संपन्न;*तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली आरोग्य तपासणी:*विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन आणि ग्रामस्थांची विनामूल्य रक्तदाब व मधुमेह तपासणी:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.११/१०/२०२६.
सेवा संकल्प अभियान 2026-27 अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील सगोडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि ग्रामस्थांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी जनजागृती करण्यासोबतच वर्षावरील ग्रामस्थांची विविध आजारासाठी मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) माधव पायघन आणि गटशिक्षणाधिकारी सारण कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः रांगेत उभे राहून आपली आरोग्य तपासणी करून घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम(RBSK) अंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी:
RBSK. च्या विशेष वैद्यकीय पथकाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सविस्तर आरोग्य तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन, उंची, डोळे, दात आणि सामान्य शारीरिक वाढीशी संबंधित घटकांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच बालकांमध्ये आढळणाऱ्या संभाव्य आजारांचे वेळीच निदान करण्यात आले.
*ग्रामस्थांची विनामूल्य आरोग्य तपासणी व औषध वितरण:
सोनाळा आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे ३० वर्षावरील ग्रामस्थांची विशेष तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (बी.पी.) लघवी आणि रक्तातील शर्करा (मधुमेह/डायबिटीज) यासारख्या आजारांची जागेवरच मोफत चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर ज्या रुग्णांना औषधांची गरज होती, त्यांना तात्काळ मोफत औषध साहित्यांचे वितरण करण्यात आले. या शिबिराला सगोडा आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन:
शिबिरा दरम्यान वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयीचे महत्त्व पटवून दिले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, नखे नियमित स्वच्छ व लहान ठेवणे, दात घासणे, पौष्टिक व संतुलित आहार घेणे. आणि पिण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करणे याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य कर्मचारी व शाळा प्रशासनाचे योगदान:
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी शाळा स्तरावर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे महत्त्व पटवून दिले. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या चोख नियोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन, ग्रामस्थांचे आरोग्य आणि गावातील स्वच्छता या त्रिसूत्री वर आधारित आयोजित केलेले हे शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.



