धाड येथे १२ हजारांचे लोखंडी चॅनेल चोरीला

बांधकामाच्या ठिकाणाहून चार चॅनेल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
धाड : येथील गट क्रमांक ४६६ मधील लेआउटच्या बांधकामासाठी ठेवलेले चार लोखंडी चॅनेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या साहित्याची एकूण किंमत १२ हजार रुपये असून, याप्रकरणी धाड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, भास्कर बाबुराव सानवणे (वय ४५, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन, जि. जालना) हे बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी धाड येथील रिजवान सलीम यांच्या शेतातील गट क्रमांक ४६६ मधील लेआउटच्या सिमेंट रस्त्याचे काम घेतले आहे. या कामासाठी त्यांनी चार लोखंडी चॅनेल घटनास्थळी ठेवले होते. ११ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत काम करून ते तेथून निघून गेले.
१२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते कामाच्या ठिकाणी गेले असता, तेथे ठेवलेले चारही लोखंडी चॅनेल आढळून आले नाहीत. प्रत्येक चॅनेलची किंमत तीन हजार रुपये असल्याने एकूण १२ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी धाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण अशोकराव चव्हाण करीत आहेत.



