महाराष्ट्रविदर्भसामाजिक

शिवकालीन निष्ठावंतांची निष्ठास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तेल्हारा तालुका

तेल्हारा;
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तथा समकालीन परिस्थितीचा मन:चक्षुनी आढावा घेतला असता प्रश्न पडतो, की भारतीय उपखंडात बलाढ्य सत्ता प्रस्थापित असताना महाराजांनी स्वराज्य कसं उभं केलं असावं? तेव्हा लक्षात येते, की त्यावेळी महत्त्वाच्या साधन संसाधनांपैकी निष्ठा जोपासणारी माणसं त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाली होती. त्यांची निष्ठा साधी, सोपी आणि सहज नव्हती तर ती सिद्ध करण्यासाठी प्राणार्पणाची होड लागायची. म्हणून दिवंगत कॉ. गोविंद पानसरे आपल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकात म्हणतात की, शिवाजीसाठी माणसं मरायला का तयार झाली? याचे उत्तर ज्याला कळलं त्यालाच शिवचरित्र कळते.
एवढा मोठा दुर्दम्य विश्वास शिवरायांनी कसा संपादन केला असावा? त्याचं काय गुपित असावं? माणसं तर बलाढ्य सत्तांसोबतही होती. परंतु त्यांच्याकडे निष्ठा का नव्हती? त्याचं कारण असं होतं, की शिवरायांनी आईवडिलांची प्रेरणा, संस्कार तथा मार्गदर्शनाने समतेचं सुराज्य निर्माण करुन त्याचा पायाच जिजाऊंनी वात्सल्य ममतेनं आणि चारित्र्यसंपन्नतेनं रचला होता. त्यामुळे प्रथमच रयतेला आपण काडी-कस्पटाप्रमाणे नसून माणूस असल्याची जाणीव झाली. त्यांच्या भाजीच्या देठापासून तर बहुबेटीच्या इज्जतीपर्यंतची काळजी वाहिल्या जात होती. स्वराज्यातील लहान मुलगाही, घोडसवारी करत शेताच्या बांधावरून जाणाऱ्या अनोळखी शिवाजी महाराजांनाच दम भरताना म्हणतो की, ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, उडविन चिंधड्या राई-राई एवढ्या.’ एवढं मोठं बळ त्या दहा वर्षाच्या मुलामध्ये कोठून आलं असेल? वरील प्रश्नाच्या मीमांसेअंती लक्षात येते, की पुणे परगण्याची जबाबदारी जेव्हा बाल शिवाजीराजे व मासाहेब जिजाऊंवर सोपविण्यात आली, तेव्हा आजचं सुसमृद्ध, विद्येचे माहेरघर तथा ऐतिहासिक वारस्याने ओतप्रोत असणाऱ्या पुण्याची, आदिलशाही आणि मोगली सत्तांनी राख-रांगोळी करून टाकलेली होती. त्यामध्ये सर्वात टोकाची भूमिका होती, ती आदिलशाही सरदार जगदेव मुरार कुलकर्णी यांची. त्यांनी पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवून, तिथे एक लोखंडी पहार रोवून त्यावर फुटकी कवडी, तुटकी चप्पल व थोटकी केरसुणी लटकवून भय व भ्रम पसरवून दिला होता, की येथे वस्ती करणारांचा वंश निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. सुलतानी आतंक आणि स्वकीयांची सांस्कृतिक दहशत यामुळे कोणीही विषाची परीक्षा न पाहता, सर्वांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याचा आसरा घेतला होता. वाड्या, वस्त्या, गावे ओस पडली होती. सगळीकडे भयान तथा स्मशान शांततेचं प्राबल्य वाढलं होतं. लांडगे, कोल्हे, कुत्र्यांसह जंगली श्वापदांनी उच्छाद मांडला होता. अशा वेळी जिजाऊंना प्रश्न पडला, की राज्य करावं तरी कुणावर? आणि कोणासाठी? तरीही विज्ञाननिष्ठ जिजाऊंनी बाल शिवाजी राजांकडून सांस्कृतिक दहशत मोडून काढून त्याच जागेवरती लाल महाल बांधला. रयतेलाही भयमुक्त तथा भटमुक्त जीवन जगण्यासाठी आवाहन केलं. त्यांच्या चरितार्थासाठी शेतजमिनीसह औत-फाटा, बी-बियाणे तथा रोख रक्कम देऊन शेतसाऱ्यातही सुट दिली. जंगली श्वापदांचा बंदोबस्त करताना करताना मात्र स्वराज्याचा दुहेरी फायदा झाला. शेतातील पिकाचं रक्षण झालं आणि शूर, चपळ, पराक्रमी तथा निष्ठावंतांची चाचपणी झाली. जीवाला जीव देणारे सवंगडी गवसले. तानाजी, सूर्याजी, कानोजी, विश्वनाथ आणि रामोशाचा दौलतराव जो स्वराज्याचा तिसरा डोळा, हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईकसह अनेक निष्ठावंत नररत्नांच्या मांदियाळीमुळे स्वराज्याचा लढाऊ खजिना ओसंडून वाहू लागला.
एक सोळा-सतरा वर्षाचा मुलगा बक्षिसासाठी नव्हे, तर बाल शिवबा राजांचं फक्त दर्शन व्हावं म्हणून दिवसभर चौदा-पंधरा लांडग्यांची शिकार करून दुसऱ्या दिवशी पहाटेच लाल महाल गाठता झाला. एकट्याने केलेल्या शिकारीवर कोणीही विश्वास ठेवत नसताना जिजाऊंच्या जोहरी नजरेने त्याला हेरलं आणि बक्षीस दिलं. त्यांच्याच आज्ञेने तो शिवबांना भेटायला रानात गेला. तिथे शस्त्रविद्येचा सराव सुरू होता. तेवढ्यात मोराचा केकारव ऐकून सर्व सवंगड्यांनी शस्त्रात्र लपवून विटी-दांडू चा खेळ खेळायला लागले. तेव्हा त्या मुलाच्या कसबी कौशल्याने सर्व थक्क झाले. तो म्हणाला, मोराच्या केकारवाचा हा काळ नव्हे, तो मानवी आवाज असून ती एक सूचना होती. आपण राजे असतानाही जंगलात युद्धसराव का करता? एवढेच नव्हे तर आपण स्वतः सर्व शस्त्र चालवू शकतो. जोगत्या, वाघ्या, मुरळी, फकीर, वासुदेव इत्यादी बहुरूपी वेश हुबेहुब धारण करू शकतो. पशुपक्ष्यांचाच नव्हे तर प्राण्यांचा आणि कोणत्याही स्त्री-पुरुषाचा आवाजही मी काढू शकतो. तेव्हा राजनीतीने ओतप्रोत शिवबांच्या तीक्ष्ण नजरेने ओळखले, की हे त्याचे कौशल्य स्वराज्याचा तिसरा डोळा होऊ शकते. म्हणून त्याचं त्यांनी नामकरण केलं बहिर्जी नाईक. बहुरूपी हेरखाते त्यांचा नायक म्हणजे रामोशाचा दौलतराव.
बहिर्जी नाईकाला पुन्हा कधीच कुणी त्याच्या मूळ रूपात पाहिलं नाही. स्वतः महाराजांनीही नाही. त्याच्यामुळे अनेक मोहिमा फत्ते झाल्या. स्वराज्यावरील अनेक संकटांना वाट मिळाली. शत्रू सैन्याची संख्या, किल्ल्याच्या चोर वाटा, तेथील राबता, कोण किती बलवान? शस्त्र किती? दारूगोळा किती? आपल्यासोबत सैन्यासह काय काय असावे? इत्यादी सर्व नाईक कधी साधुच्या रूपाने, कधी मौलवी होऊन तर कधी फकिराचा वेश धारण करून, ठरलेल्या सांकेतिक भाषेत, भारुडाने, नकलेने किंवा पोवाड्यातुन कथन करायचे. इतरांचे मनोरंजन व्हायचे तर शिवाजी महाराजांची रणनीती ठरायची.
असेच आणखी कित्येक निष्ठावंत बलबाहू स्वराज्याच्या पदरी होते. पन्हाळगडावरून सुटका करताना शिवा काशीद (न्हावी) हा शिवाजी महाराजांसारखा दिसतो म्हणून, माहीत असतानाही स्वतःहून मरणासाठी तयार झाला. आपण पकडलेला शिवाजी खोटा आहे हे खानाला कळताच, एकाच वेळी असंख्य तलवारी त्याच्या शरीरात प्रवेशित झाल्या. क्षणाचाही विलंब न लावता त्याने खऱ्या शिवाजींना पकडण्यासाठी कुमक रवाना केली. तेव्हा विशाळगडावर पोहोचणे अशक्य म्हणून गनिमाला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे (कायस्थ) आणि साधा नावाचाही उल्लेख नसणारे अनेक निष्ठावंत मावळे स्वतःहून सरणावरी जळण्यासाठी तयार झाले. लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. या उदात्त भावनेने स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा घेण्यासाठी जाणाऱ्या तानाजी आणि सूर्याजीचा त्याग, बलिदान आणि पराक्रमाची इतिहासाने दखल घेतली.
सजातीय तथा स्वधर्मियांच्या निष्ठेपेक्षाही परधर्मीयांची निष्ठा एवढी पराकोटीची होती, की कोणी दगाफटका अथवा गद्दारी केल्याचं साधं उदाहरणही इतिहासाकडे उपलब्ध नाही.
१६४८ ला आदिलशाही लष्करातील पाचशे ते सातशे पठानांची फौज स्वराज्यात दाखल झाली. जी शेवट पर्यन्त ईमानाला जागली. सैन्याचा पहिला सरनोबत नूरखान बेग होता. स्वराज्यानिष्ठ, आग्रा सुटकेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारा मदारी मेहतर, तर महाराजांचा अंगरक्षक सिद्धी इब्राहिम होता. (अंगरक्षक काय करू शकतो? हे इंदिरा गांधी यांच्या रूपाने सर्वांना माहितच आहे.) विदेशी आक्रमक समुद्री तटावरून जनतेला खूप त्रास द्यायचे. समुद्री मार्गे महिलांचा व गुलामांचा व्यापार करायचे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतातील पहिले आरमार (नेव्ही) उभारून त्याचा प्रमुख निष्णात दर्यावरी दौलतखान याची नियुक्ती केली. आणीबाणीच्या वेळी कुठे, कोणत्याही प्रसंगातून अचूक मार्ग काढणारे शिवरायांचे निष्णात वकील व सचिव हे काझी हैदर होते. सोबतच इब्राहीम खान, हुसेनखान मियाना इत्यादी सह अनेकांची इतिहासाला नोंद घेणे भाग पडले.
यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवराय जसे तुकाराम महाराजांना गुरु मानायचे तसेच बाबा याकूत या मुस्लिम धर्मगुरूंनाही आपले प्रेरणास्थान मानायचे. (कथा, कादंबरी किंवा काही बखरिंमध्ये इतरही काही गुरूंचा उल्लेख आढळतो परन्तु समकालीन साहित्यात त्याचे पुरावे मिळत नाहीत.)
यावरून हेच दिसून येते, की शिवरायांचे राज्य हे लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी होते. त्यांच्याकडे मतभेद, जातीभेद, अस्पृश्यता, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था इत्यादीला थारा नव्हता. त्यामुळे आज जर कोणी महाराजांच्या नावाने उच्छाद मांडत असेल तर त्याने शिवचरित्र अभ्यासावे.
शिवरायांकडे जशी नीतिमत्ता होती तशीच त्यांनी इतरांकडूनही अपेक्षिली. आजच्या नेतृत्वाकडे ती किती आहे? हा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. आज सगळीकडे निष्ठावंताची वाणवा निर्माण झालेली दिसते. संविधानिक पदावर आरुढ होत, संविधानाची शपथ घेऊन अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले दिसतात. निष्ठा नावाची गोष्ट नामशेष होण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे. जोपर्यंत नीतिमत्ता आणि शील जोपासून शिवकालीन निष्ठेचा आदर्श घेतला जात नाही, तोपर्यंत भीतीपोटी का होईना, निष्ठावंतांची निष्ठा अशीच वेशीला टांगून सर्वसामान्यांना सर्वतोपरी वेठीस धरले जाईल!….

       भिमराव परघरमोल       
   व्याख्याता तथा अभ्यासक 

फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो. ९६०४०५६१०४

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button