व्यसनाला नाही, संस्कारांना होकार’ : माटरगावात विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : सागर रावणचोरे | माटरगाव
माटरगाव येथील महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार सांगळे साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार सांगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच निरोगी, शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवनशैली अंगीकारण्याची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि कायद्याचे पालन यालाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या विषयालाही त्यांनी स्पर्श करत वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.



