गुरूंबद्दल कृतज्ञता, विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ; चांगदेव येथे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात

गुरूंबद्दल कृतज्ञता, विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ; चांगदेव येथे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
मुक्ताईनगर प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत चांगदेव येथील श्री एस. बी. चौधरी हायस्कूल येथे नाथश्री फाउंडेशनच्या वतीने शिक्षक गौरव व विद्यार्थी हिताचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला, तसेच शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कार्यक्रमात नाथश्री फाउंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर इंगळे यांच्या हस्ते विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही. एस. चौधरी तसेच हरताळे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. के. पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती चौधरी व सर्व शिक्षकांचाही फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यानंतर फाउंडेशनच्या सौजन्याने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माजी मुख्याध्यापक विजय सर व डी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुरुजनांचा सन्मान आणि जीवनातील मूल्ये याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पवन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डिगंबर रामचंद्र चौधरी होते.
यावेळी श्रीमती आरती राजेंद्र चौधरी, संस्थेचे सचिव विनोद महाजन, संचालक विनायक पाटील, जे. के. चौधरी, अतुल पाटील यांच्यासह नाथश्री फाउंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर इंगळे, सौ. आरती इंगळे, उपाध्यक्ष देवेंद्र काटे, सचिव अनिकेत सोनवणे तसेच सदस्य अक्षय कोळी, ईश्वर सोनवणे, रूपेश सोनवणे, प्रशांत पाटील, मंगेश भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा नाथश्री फाउंडेशनचा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.



