क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हा

विश्वासाला तडा; चोरीचा बनाव रचून नोकरानेच लंपास केले ₹1.98 लाख

सावदा पोलिसांची चार तासांत कारवाई; संपूर्ण रक्कम जप्त, आरोपी अटकेत

सावदा प्रतिनिधी | शेख मुख्तार

रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील सरकारमान्य देशी दारू दुकानातील व्यवसायाची रोकड घेऊन जाणाऱ्या कामगारानेच चोरीचा बनाव रचून तब्बल ₹1 लाख 98 हजारांची रक्कम अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावला असून, आरोपीला अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र भागवत जयस्वाल (वय 60, रा. पंचमुखी हनुमान नगर, रावेर) यांचे थोरगव्हाण येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील कर्मचारी शेख सुफियान शेख अतीक (वय 20, रा. नागझीरी रोड, इमामवाडा, रावेर) हा नेहमीप्रमाणे व्यवसायातून जमा झालेली रोकड रावेर येथे मालकाकडे पोहोचवत असे.

दि. 13 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.45 वाजता शेख सुफियान याने दुकानातील ₹1,98,000 इतकी रोकड घेऊन दुचाकीने रावेरकडे प्रस्थान केले. त्यानंतर सावदा–रावेर मार्गावरील राजदीप पेट्रोल पंपाजवळ (वाघोदा बुद्रुक) दोन अज्ञात इसमांनी पल्सर मोटारसायकलवर येऊन त्याच्याकडील पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची माहिती त्याने मालक व पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व पथकाने फिर्यादी व कर्मचाऱ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. तसेच थोरगव्हाण ते राजदीप पेट्रोल पंप या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र, तपासादरम्यान शेख सुफियान याच्या कथनात विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीचा बनाव स्वतःच रचून विश्वासाने दिलेली रोकड स्वतःच लंपास केल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्ह्यात बीएनएस कलम 306 ची भर घालण्यात आली. आरोपीला अटक करून त्याच्याकडून ₹1 लाख 98 हजारांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका निलेश बाविस्कर, विनोद तडवी, संजीव चौधरी, उमेश पाटील, पोना सुनील सैंदाणे, पोका मयूर पाटील, संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार व सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांनी सहभाग घेतला.

अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा करून संपूर्ण रक्कम हस्तगत केल्याने सावदा पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button