मालेगांव शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ;
शहरातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने ,शाळा महाविद्यालय यांनी पाळला कडकडीत बंद
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव – : जालना जिल्ह्यामधील निष्पाप आंदोलकांवर निर्दयी लाठी हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून मालेगाव शहरात ७ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. सकल मराठा समाजाच्या वतीने सदर बंद पाळण्यात आला. त्यामधे अनेक सामाजीक व राजकीय संघटना सहभागी झाल्या होत्या .
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे या गावांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे .या मागणीसाठी गेल्या ८ दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी पोलिसांची फार मोठी कुमक त्या ठिकाणी पाठवण्यात आली. आणि शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनातील कार्यकर्ते तसेच निष्पाप लोकांवर अमानुष असा लाठी चार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेक जण जखमी झाले .जखमीमध्ये पोलिसांचा सुद्धा समावेश होता. पोलिसांना हे आंदोलन चिरडण्याचे आदेश ज्यांनी दिले याबाबत मराठा संघटनांमध्ये तीव्र रोष असून या लाठी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यां पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच मा गृहमंत्र्यांनी लाठीहल्ल्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. तसेच मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी सदर आंदोलन अंतरवाली सराटे या गावामध्ये सुरू असुन या आंदोलनाला महाराष्ट्र भरातुन प्रचंड मोठा पाठिंबा मिळत आहे . गावागावांमध्ये विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मालेगाव शहरांमध्ये सुद्धा ७ सप्टेंबर रोजी या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंद पुकारण्यात आला होता. सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मालेगांव शहरातील सर्व शाळा , हॉटेल्स , व्यावसाईक प्रतिष्ठाणे आदी कडकडीत बंद ठेवण्यात आली होती . या बंदला सकल मराठा समाजासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष , राष्ट्रवादी शरद पवार गट, अण्णाभाऊ साठे महासंघ , .यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. हा बंद या बंदमध्ये शहरातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग दिला. त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतिने आभार व्यक्त करण्यात आले .



