वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही; उत्राद्यात महिलांचा ग्रामपंचायतीला इशारा

उत्रादा ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घेराव; पाणी साचण्याच्या समस्येवर प्रशासनाविरोधात तीव्र संताप
चिखली | प्रतिनिधी (अरुणा दत्तात्रय खंडागळे)
चिखली तालुक्यातील उत्रादा गावातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घेराव घालत निषेध आंदोलन केले.
गावातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने परिसरात चिखल, दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असल्याचे आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले.
यावेळी महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्याची, तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी केली. प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलनाचा इशारा कायम असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
गावातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.



