मुक्ताईनगरात सर्रास गुटखा विक्री; सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर तस्करी – प्रशासन डोळेझाक करतेय का?मुक्ताईनगर, जि. जळगाव |

प्रतिनिधी महाराष्ट्रात गुटख्यावर कडक बंदी असतानाही मुक्ताईनगर तालुक्यात “विमल”सारख्या गुटख्याची सर्रास विक्री होत असून, हे गुटखे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर तस्करी करून आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अवैध व्यवहारामुळे मुक्ताईनगर तालुका गुटखा तस्करीचा ‘हब’ ठरत असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या माध्यमातून गुटखा पोहोचवला जातोय.
मध्यप्रदेश सीमेलगत असल्याचा गैरफायदा
मुक्ताईनगरपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशची सीमा असून, इच्छापुर, शहापूर, बुरहानपूर आदी भागांमधून महाराष्ट्रात गुटखा आणला जातो. मध्यप्रदेशात गुटख्यावर बंदी नसल्याने तिथून मोठ्या प्रमाणावर साठा घेतला जातो आणि महाराष्ट्रात गैरमार्गाने विक्री केली जाते.
चेक पोस्ट आणि RTO यांची भूमिका संशयास्पद
सीमेवर असलेल्या चेकपोस्ट आणि RTO अधिकारी यांच्याकडून कोणतीही ठोस तपासणी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होत आहेत की, या गाड्या चेकपोस्टवर थांबत नाहीत का? की यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत आहे? यावरूनच हे स्पष्ट होते की, यामागे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, संबंधित यंत्रणा डोळेझाक करत आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रशासनावर आरोप
या विषयावर यापूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत अनेक गुटख्याच्या गाड्या पोलीस प्रशासनाकडे स्वाधीन केल्या होत्या. नुकत्याच शेतकरी जमिनी संदर्भातील आंदोलनादरम्यान देखील त्यांनी गुटखा तस्करीवरून पोलिस प्रशासनावर थेट आरोप केले होते.
मुक्ताईनगरात खुलेआम विक्री; नवीन PI आशिष अडसूळ यांच्याकडून अपेक्षा
सध्या मुक्ताईनगर शहरासह तालुक्यांतील छोट्या दुकानांपासून ते शहरातील मुख्य भागांपर्यंत गुटख्याची उघडपणे विक्री होत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नुकतेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून आशिष अडसूळ यांची नियुक्ती झाली असून, सुज्ञ नागरिकांना त्यांच्याकडून कठोर कारवाईची आशा आहे.
मुक्ताईनगर गुटखा तस्करीचा केंद्रबिंदू?
संपूर्ण घडामोडी पाहता, मुक्ताईनगर हा गुटखा तस्करीचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये येथून गुटखा पोहोचवला जातोय. त्यामुळे ही केवळ स्थानिक नव्हे तर राज्यव्यापी चिंता बनली आहे.
शासनाने लक्ष घालण्याची गरज
गुटखा तस्करीमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असून, त्याचबरोबर राज्य शासनाच्या नियमांची थेट पायमल्ली होत आहे. त्यामुळे राज्य शासन, अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि सीमा सुरक्षा यंत्रणांनी यावर तातडीने कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.



