अष्टविनायक कॉलनीत चेन स्नॅचिंगचा धक्कादायक प्रकार; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घरासमोर फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली; सुदैवाने पोत नकली, मात्र नागरिकांमध्ये भीती
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अष्टविनायक कॉलनी | प्रतिनिधी
अष्टविनायक कॉलनी परिसरात रात्रीच्या सुमारास चेन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे १०.१५ वाजता डॉ. सोपान पाटील यांच्या पत्नी घरासमोर फेरफटका मारत असताना, श्री. अविनाश पाटील यांच्या घराजवळ त्यांच्या गळ्यातील पोत हिसकावून नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुदैवाने संबंधित महिलेच्या गळ्यातील पोत नकली असल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. तसेच या घटनेत महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, रहिवासी परिसरात रात्रीच्या वेळी घरासमोर फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली जाणे ही बाब अत्यंत गंभीर असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, रात्रीच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. केवळ पोत नकली असल्याने आर्थिक नुकसान टळले; मात्र उद्या हाच प्रकार खऱ्या दागिन्यांसह आणि अधिक गंभीर स्वरूपात घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा दुचाकीवरून फेरफटका मारणारे इसम आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहून तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तसेच कॉलनी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
महिला भगिनींनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगावी. दागिने घालून एकट्याने फिरणे टाळावे आणि संशयास्पद हालचाली दिसताच तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.



